वनस्पतींचे वितरण | Vanaspati che vitran marathi mahiti

वनस्पतींचे वितरण | Vanaspati che vitran Marathi Mahiti

पृथ्वीवरील वनस्पतींच्या वितरणात मोठ्या प्रमाणांत विविधता आढळते. विषुववृत्तापासून थेट ध्रुवापर्यंत तसेच समुद्रसपाटीपासून उंच पर्वतीय शिखरापर्यंत वनस्पतींचे वेगवेगळे विभाग आढळतात. वनस्पतींचे हे वितरण विविध घटकांवर अवलंबून असते. या घटकांमुळे वनस्पती विभागांवर काही प्रकारचे नियंत्रण असल्याचेही दिसून येते. या घटकांमध्ये-

(१) सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता, पर्जन्य, जमिनीतील ओलावा यांसारखे हवामान घटक
(२) जमिनीतील पोषक घटक, जमिनीचा पोत, जमिनीची रचना, त्यातील आम्ल आणि अल्कयुक्त घटक, क्षारता व जमिनीचे अन्य गुणधर्म यांसारखे मृदाविषयक घटक
(३) प्राणी आणि मानव यांसारख्या सजीव घटकांचा परिणाम, सूक्ष्मजीव वनस्पतीच्या मृत पेशी खातात, गांडूळ, अन्य कीटक जमीन भुसभुशीत करतात, जनुकातील बदल, परजीवित्व, निवड, स्पर्धा यांसारखे जीवविषयक घटक
(४) भू-पृष्ठरचना, उतार, उताराचा कोन, उताराची शीघ्रता, नद्या, वारा यांचे वहन व संचयनकार्य यांसारखे प्राकृतिक घटक
(५) खंडवहन, अंतर्गत शक्ती व त्यामुळे होणाऱ्या हालचाली, उष्णता आणि कंपन यांसारखे अंतर्गत घटक
(६) अरण्यांत उद्देशपूर्वक वा अपघाताने किंवा वीज पडल्याने लागणाऱ्या आगी यांसारखे अरण्य आगीचे घटक
(७) वनस्पतींचा जागतिक प्रसार किंवा पांगणे
(८) मानवी मध्यस्थी किंवा ढवळाढवळ – आदींचा समावेश होतो

वनस्पतींचे वितरण वरील घटकां-बरोबरच एक, जीवचक्र परिसंस्था, दोन, अक्षवृत्त आणि उंचीविषयक संकल्पना आणि तीन, वनस्पती-समाजाचे गुणधर्म लक्षात घेऊन करता येते.

जीवचक्र परिसंस्थांत

(१) जमिनीवरील जीवचक्र
(२) सागरातील क्षार पाण्यातील जीवचक्र,
(३) जमिनीवरील गोड्या शुद्ध पाण्यातील जीवचक्र

यांचा समावेश होतो.

यात जमिनीवरील वितरण महत्त्वाचे असून, त्यात-विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींचे जागतिक वितरण किंवा विशिष्ट परिसंस्थेमुळे होणारे वितरण यांसारखे पर्याय आहेत.

त्या दृष्टीने

(१) विषुववृत्तावरील बारमाही अरण्ये,
(२) उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये,
(३) मोसमी अरण्ये,
(४) समशीतोष्ण कटिबंधातील सदाहरित अरण्ये,
(५) समशीतोष्ण कटिबंधातील पानझडी अरण्ये,
(६) सूचिपर्णी अरण्ये,
(७) सदाहरित टणक लाकडाची अरण्ये,
(८) सॅव्हानाचा निर्वृक्ष गवताळ प्रदेश,
(९) रखरखीत हवामानाचा ओसाड प्रदेश आणि
(१०) अतिशीत हवामानाचा ओसाड प्रदेश इत्यादी प्रकार लक्षात घेता येतात.

(१) विषुववृत्तीय बारमाही अरण्ये: भरपूर उष्णता आणि बारमाही पाऊस या अनुकूल हवामानामुळे या प्रदेशातील अरण्ये बारमाही, सदाहरित व घनदाट असतात. यांत महोगनी, एबनी, सिंकोना, ग्रीनहार्ट, रोझवूड, शिसवी, रबर, वेल्यानाड असे अनेक वृक्ष आहेत. खूपच दाट वेलींची जाळे आणि तितकीच दाट झाडे-झुडपे असलेल्या वनांना ब्राझिलमध्ये ‘सेल्व्हा’ या संज्ञेने ओळखले जाते. येथील सर्वसाधारण वृक्षाची उंची ८० ते १०० मीटर असते. वृक्षाची पानेही विस्तृत, लांब व रुंद असतात. अॅमेझॉनचे खोरे आणि आग्नेय आशियातील २५ ते २६० सें. तापमान व २०० ते २५० सें. मी. पर्जन्य तसेच भरपूर सूर्यप्रकाश येथे असतो. अनेक प्रकारची बांडगुळेही या अरण्यांत आढळतात. या अरण्यांतील लाकूड फार टणक असते. ते सहज कापता किंवा जाळता येत नाही. निरनिराळ्या रंगांच्या फळाफुलांनी ही अरण्ये नेहमी डवरलेली असतात.

(२) उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये: ही अरण्ये विषुववृत्तीय अरण्यांप्रमाणेच फार टणक आणि कठीण लाकूड देणाऱ्या वृक्षांची असतात. या प्रदेशात तापमान अधिक असते; त्यामानाने पर्जन्यमान कमी होत जाते. यामुळे अरण्ये कमी दाट आणि त्यांतील वनस्पती कमी उंच असतात. यात साग, सिंकोना, रबर, नारळ, वेल्यानाड यांची अरण्ये असतात.

(३) मोसमी अरण्ये: दक्षिण व आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलियाचा उत्तर भाग येथे पाऊस उन्हाळ्याच्या उत्तरार्धात पडतो. हवामानानुसार येथील वनस्पतिजीवन भिन्न प्रकारचे आढळते. २०० ते २५० सें. मी. पर्जन्य असलेल्या प्रदेशात अॅमेझॉन प्रकारची साल, एबनी, रबर, नारळ, वेल्यानाड इत्यादी वृक्षांची अरण्ये आढळतात. १०० ते २०० सें. मी. पर्जन्याच्या प्रदेशात पानझडी प्रकारची अरण्ये आढळतात. त्यात निलगिरी, शिसव, सिंकोना, खैर, पळस हे वृक्ष दिसतात. ४० ते १०० सें. मी. पर्जन्याच्या प्रदेशात आंबा, हिरडा, बेहडा, खैर, वड, पिंपळ हे वृक्ष दिसतात; तर ५० सें. मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात बोर, बाभूळ, निंब, चिंच, चंदन हे वृक्ष प्रामुख्याने असतात. हे वृक्ष कमी पानांचे व उन्हाळ्यात पानांऐवजी काटे असलेले असतात.

(४) समशीतोष्ण कटिबंधातील सदाहरित अरण्ये: येथे पाऊस कमी-जास्त प्रमाणात पण वर्षभर पडत असल्याने या प्रदेशात सदाहरित अरण्ये आहेत. मोठमोठी जंगले मात्र येथे आढळत नाहीत. येथील वनस्पती दाट नसल्याने वनस्पतीच्या विस्तारास भरपूर वाव मिळतो. या वनस्पतींची पाने बारीक गोलाकार असतात. त्यांना उंची मात्र फारशी नसते. या अरण्यांत पाईन, ओक, लॉरेन, सिंकोना, रबर, युकॅलिप्टस, अक्रोड इत्यादी वृक्ष आढळतात.

(५) समशीतोष्ण कटिबंधातील पानझडी अरण्ये: हा प्रदेश पानझडी आणि सदाहरित अशा दोन्ही प्रकारच्या वनस्पतींचा आहे. ओक, अॅश, वॉलनट, बीच, एल्म, अॅपल, बर्च, मॅपल इत्यादी पानझडी वनस्पती तर लार्च, स्प्रूस, पाईन, फर, हेमलॉक इत्यादी सूचिपर्णी वनस्पती येथे आहेत. हिमालयात थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून पानझडी वृक्ष पाने गाळतात. या प्रकारची अरण्ये उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागात, पश्चिम युरोप व पूर्व आशियात आहेत.

(६) सूचिपर्णी अरण्ये: लार्च, स्प्रूस, पाईन, फर, हेमलॉक, मॅपल, बर्च इत्यादी वनस्पती येथे आढळतात. सूचिपर्णी वनस्पती जवळजवळ सर्वत्र आढळतात. बहुतेक अरण्ये एकाच प्रकारच्या वनस्पतींनी लांबच्या लांब व्यापलेली असतात. या वनस्पतींचे आच्छादन दाट, आकार शंक्वाकृती, पाने जाड व तेलकट, अणकुचीदार, अरुंद, टोकाकडे सुईच्या आकाराची निमुळती असतात. यामुळे यावर बर्फ साचत नाही, ते पानांवरून घसरून जाते. या वनस्पतींचे लाकूड हलके व मऊ असते.

येथे पाऊस कमी पडतो; पण हवामान थंड असल्याने बाष्पीभवन मंद होते. त्यामुळे जमिनीत ओलावा दीर्घकाळ टिकतो. ही अरण्ये उत्तर अमेरिकेत सेंट लॉरेन्स नदीच्या खोऱ्यात तसेच उत्तरेस अलास्का ते कॅनडा दरम्यान व न्यू फाऊंडलंड, लॅब्रेडॉर, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, रशियाचे सैबेरियन क्षेत्रात मुख्यत्वेकरून आढळतात.

(७) सदाहरित टणक लाकडाची अरण्ये: भूमध्यसामुद्रिक हवामानाच्या प्रदेशात ही अरण्ये आहेत. येथे हिवाळ्यात पाऊस पडतो. उन्हाळा कोरडा असतो. अशा उन्हाळ्यास तोंड देण्यासाठी वनस्पतींची पाने बारीक, तेलकट, जाड, कित्येक वेळी काटेरी असतात. यामुळे पानांवाटे होणारे बाष्पीभवन टळते. जास्त पर्जन्याच्या भागात ऑलिव्ह, ओक, चेस्टनट, अक्रोड, देवदार, चिनार, सुरू, फर वगैरेंची अरण्ये आहेत. कमी पावसाच्या प्रदेशात लिंबू, द्राक्षे, डाळिंब, मोसंबी, संत्री, पीच, पेअर, बदाम, जरदाळू, तुती या वनस्पती आढळतात. ही अरण्ये दक्षिण युरोप, कॅलिफोर्निया, चिली, दक्षिण आफ्रिकेच्या केप व ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया भागात आढळतात.

(८) सॅव्हाना प्रकारची अरण्ये: विषुववृत्तापासून दूर जावे तसतसा पाऊस कमी होत जातो. त्याचा परिणाम होऊन विषुववृत्तीय घनदाट जंगले कमी होत जाऊन ती विरळ होतात. त्यांची उंची, हिरवेपणाचा काळ, पानांचा आकार कमी होत जाऊन पुढे पुढे वनस्पती मर्यादित होत जाऊन गवताचे प्रमाण वाढते. ९ ते १० चौ. कि. मी. मध्ये एखादी दुसरी वनस्पती आढळते. त्याभोवताली गवत ३ ते ४ मीटरपर्यंत वाढलेले असते. यात सामान्यतः बोर, बाभूळ, बेल, अकेशिया, बेओबाब अशी कमी पानांची, जाड सालाची, डमरूच्या आकाराची काटेरी वनस्पती आढळते. दक्षिण अमेरिकेतील ओरिनोकोचे खोरे, गियाना, ब्राझीलचा डोंगराळ प्रदेश, आफ्रिकेतील केनिया, टांझानिया, झांबिया, झिंबाब्वे, अंगोला हे प्रदेश; ऑस्ट्रेलियाचा ईशान्ये-कडील किनारा व उत्तरेकडील भाग यांचा यांत समावेश होतो.

(९) रखरखीत हवामानाच्या ओसाड प्रदेशातील अरण्ये: पावसाच्या अभावामुळे येथील वनस्पती बारीक पानांची, जाड सालीची, डमरूच्या आकाराची, पानांऐवजी काटे असलेली आढळते. काही वनस्पती मिळालेले पाणी घेऊन आपल्या बुंध्यात किंवा पानांत साठवून ठेवतात. काही वनस्पतींची मुळे पाण्याचा शोध घेत ४/५ मीटर खोलवर जातात. अनेक वनस्पती अर्धमृत स्थितीत जिवंत राहतात, तर काही वनस्पती आपला जीव एखाद्या कोशात गुंडाळून जमिनीवर पडतात. वाऱ्याबरोबर उडत दुसरीकडे गेल्यावर किंवा अन्य कारणाने ओलावा मिळाल्यावर आपले जीवनचक्र सुरू करतात. काही पाणथळ ठिकाणी वनस्पतिजीवन प्रसन्न असते. पाम, खजुराची झाडे, संत्री, मोसंबी, द्राक्षे, लिंबे, डाळिंबे, कलिंगडाच्या बागा येथे आढळतात.

उत्तर अमेरिकेतील कॅलिफोर्निया, कोलोरॅडो, अॅरिझोना, मेक्सिकोचे वाळवंट, दक्षिण अमेरिकेतील (पेरू आणि चिली या देशांमध्ये पसरलेले) अटाकामा वाळवंट, आफ्रिकेतील सहारा व कलहारी वाळवंट, आशियातील अरबस्तान, थरचे वाळवंट, मध्य व पश्चिम ऑस्ट्रेलियातील वाळवंटे यांचा समावेश या विभागात होतो.

(१०) अतिशीत हवामानाचा ओसाड प्रदेश: आर्क्टिक महासागराच्या काठाने कॅनडा, युरेशियाचा उत्तर भाग यात येतो. असा भाग दक्षिण गोलार्धात नाही. बर्फाच्छादित जमीन, कडक थंडी, पावसाचा अभाव यामुळे झाडेच काय पण गवतसुद्धा येथे उगवत नाही. दक्षिणेकडे थोडेफार शेवाळे व खुरटे गवत उगवते. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर ही स्थिती झपाट्याने बदलते. जमीन डोके वर काढते. थोडेफार शेवाळे आणि लहान-लहान झाडे सर्वत्र दिसू लागतात. या झाडांचे आयुष्य अल्प असल्याने फारच थोड्या काळात त्यांना पाने, मुळे येऊन प्रदेशाचे स्वरूप एकदम बदलते. ५ ते ६ आठवड्यांपूर्वी पांढरीशुभ्र असलेली ही सृष्टी रंगीबेरंगी फुलांनी बहरून येऊन नयनमनोहर दिसू लागते; पण २ ते ३ आठवड्यांत हे दृश्य नष्ट होऊन परत सर्वत्र हिम पडू लागते. सारी नाजूक झाडे त्याखाली झाकून जातात.

Also Read

Ecosystem Meaning in Marathi

Leave a Comment