पृथ्वीची माहिती मराठी मध्ये | Earth information in Marathi 2025
पृथ्वीचा आकार गोल आहे; परंतु अगदी चेंडूसारखा नाही. विषुववृत्तीय भागात पृथ्वीचा आकार फुगीर आहे तर दोन्ही ध्रुवांवर कमी-अधिक चपटा आहे. थोडक्यात, पृथ्वीचा आकार संत्र्यासारखा आहे. पृथ्वीच्या या विशिष्ट आकाराला ‘जिऑईड’ ही संज्ञा आहे. पृथ्वीच्या विषुववृत्तीय परिघाची लांबी ४०,०७७ कि. मी. असून तिचा ध्रुवीय परीघ सुमारे ४०,००९ कि. मी. आहे.
पृथ्वीचे परिवलन
पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, या गतीला ‘पृथ्वीचे परिवलन’ असे म्हणतात. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास २३ तास ५६ मिनिटे ४.०९ सेकंद लागतात; परंतु सूर्यसापेक्ष अर्थाने पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास सुमारे २४ तास लागतात, असे आपण म्हणतो. वेगळ्या भाषेत यालाच पृथ्वीची ‘दैनिक गती’ असे म्हटले जाते. पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस व रात्र निर्माण होतात.
पृथ्वीचे परिभ्रमण
पृथ्वी स्वतःभोवती फिरत असतानाच एका ठरावीक मार्गाने सूर्याभोवतीही फिरत असते. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे व ४६ सेकंद इतका काळ लागतो. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला ‘पृथ्वीचे परिभ्रमण’ किंवा ‘पृथ्वीची वार्षिक गती’ असे म्हणतात. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीवर त्रऋतूंची निर्मिती होते.
ग्रहण
चंद्र पृथ्वीभोवती फिरतो व पृथ्वी चंद्रासह सूर्याभोवती फिरते. चंद्र आणि पृथ्वी हे दोनही आकाशगोल घनगोल असल्याने त्यांच्या सावल्या पडतात. पृथ्वी व चंद्र आकाराने सूर्याच्या तुलनेत लहान आहेत; परंतु ते एकमेकांना सूर्याच्या तुलनेत जवळही आहेत. त्यामुळे सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाच्या मार्गांत पृथ्वी आल्याने तिची सावली चंद्रावर पडून चंद्र झाकला जातो. पौर्णिमा असूनही काही काळ चंद्र दिसत नाही; याला ‘चंद्रग्रहण’ असे म्हणतात. चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेला होते. सूर्यग्रहण होताना सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाच्या मार्गात चंद्र येतो व पृथ्वीच्या काही भागावर त्याची सावली पडते; यामुळे काही ठिकाणांहून सूर्य काही काळ अजिबात दिसत नाही; याला ‘खग्रास सूर्यग्रहण’ असे म्हणतात; तर काही ठिकाणांहून काही काळ सूर्याचा काही भाग दिसत नाही; यास ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ असे म्हणतात. सूर्यग्रहण फक्त अमावस्येलाच होते. या वेळी सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र असतो; त्यामुळे चंद्राची सावली पडून लहान असलेल्या चंद्रामुळे फार दूर असलेला पूर्ण सूर्य किंवा त्याचा काही भाग झाकला जातो व सूर्यग्रहण होते.
चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी ५.२५ चा कोन करते; त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेस किंवा अमावस्येस ग्रहण लागत नाही. साधारणपणे वर्षभरात चंद्र व सूर्य यांची मिळून सात ग्रहणे होतात. ज्या वेळी पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्यामध्ये येते त्या वेळी चंद्रग्रहण लागते. ज्या वेळी चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये येतो त्या वेळी सूर्यग्रहण लागते. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेस येते, तर सूर्यग्रहण नेहमी अमावस्येस येते.
उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव
पृथ्वीवरील जो बिंदू ध्रुवताऱ्याच्या अगदी समोर येतो व पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना तोही आपल्याच जागी स्वतःभोवती फिरत असतो, त्या बिंदूस ‘उत्तर ध्रुव’ असे म्हणतात. या बिंदूच्या अगदी विरुद्ध बाजूस असलेल्या बिंदूस ‘दक्षिण ध्रुव’ असे म्हणतात. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या, पृथ्वीच्या पोटातून सरळ जाणाऱ्या काल्पनिक रेषेस ‘पृथ्वीचा आस’ असे म्हटले जाते. पृथ्वी या आसाभोवती फिरत असते.
विषुववृत्त व गोलार्ध
(१) दोन्ही ध्रुवांच्या बरोबर मध्ये दोन्ही ध्रुवांपासून समान अंतरावर भू-पृष्ठावरून जाणारी काल्पनिक वर्तुळाकार रेषा म्हणजे ‘विषुववृत्त’ होय. या काल्पनिक रेषेमुळे पडणाऱ्या पृथ्वीगोलाच्या समान भागांना ‘गोलार्ध’ असे म्हटले जाते.
(२) विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंतचा गोलार्ध ‘उत्तर गोलार्ध’ म्हणून ओळखला जातो; तर दक्षिण ध्रुवापर्यंतच्या गोलार्धास ‘दक्षिण गोलार्ध’ असे म्हणतात.
अक्षवृत्ते
(१) पृथ्वीच्या पृष्ठभागावर, विषुववृत्तास समांतर काढलेल्या व समान अक्षांशबिंदू साधणाऱ्या काल्पनिक रेषांना ‘अक्षवृत्ते’ असे म्हटले जाते.
(२) अक्षवृत्ते पूर्ण वर्तुळाकार असतात.
(३) विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंतच्या अशा रेषांना ‘उत्तर अक्षवृत्ते’ तर विषुववृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंतच्या अशा रेषांना ‘दक्षिण अक्षवृत्ते’ असे म्हटले जाते.
रेखावृत्ते
(१) दोन ध्रुवांना जोडणाऱ्या व अक्षवृत्तांना लंबरूप असणाऱ्या भू-पृष्ठावरील काल्पनिक रेषांना ‘रेखावृत्ते’ असे म्हटले जाते.
(२) रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात.
(३) या सर्वच रेषा लांबीने सारख्या व दक्षिणोत्तर जाणाऱ्या असल्याने यांपैकी कोणत्या रेषेस मूळ वा आधारभूत मानावयाचे हा प्रश्न असल्याने, आंतरराष्ट्रीय संकेतानुसार इंग्लंडमधील ‘ग्रीनिच’ या शहराजवळून जाणाऱ्या रेखावृत्तास ‘मूळ रेखावृत्त’ मानले जाते.
अक्षांश
विषुववृत्त व दक्षिण वा उत्तर ध्रुव यांच्यामध्ये येणाऱ्या अनेक बिंदूपैकी एखादा बिंदू भू-मध्याशी जोडला असता तयार होणारी काल्पनिक रेषा विषुववृत्तीय प्रतलाच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस पृथ्वीकेंद्राजवळ जो कोन तयार करते, त्यालाच त्या बिंदूचा ‘अक्षांश’ असे म्हणतात. (समजा, अशा बिंदूने विषुववृत्तीय प्रतलाच्या दक्षिणेस पृथ्वीकेंद्राशी ३५० चा कोन केला असेल तर आपण त्या बिंदूचा अक्षांश ३५० दक्षिण आहे, असे म्हणतो.)
रेखांश
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एखाद्या बिंदूच्या प्रतलाने मूळ रेखावृत्ताच्या प्रतलाशी पूर्वेस अगर पश्चिमेस केलेल्या कोनास आपण ‘रेखांश’ असे म्हणतो. (समजा, अशा बिंदूचे प्रतल मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेस असेल व मूळ रेखावृत्ताच्या प्रतलाशी तो ३० अंशाचा कोन करीत असेल, तर भू-पृष्ठावरील त्या बिंदूचे स्थान आपण ३०० पश्चिम रेखांश असे निश्चित करतो.)
वातावरण व हवामान
(१) पृथ्वीभोवतीच्या गोलाकार वायुरूप पट्ट्यास ‘वातावरण’ असे म्हटले जाते. वातावरण हे अनेक वायूंचे मिश्रण आहे. यात नायट्रोजन व ऑक्सिजन हे वायू अधिक प्रमाणात म्हणजे अनुक्रमे ७८.०८ टक्के व २०.९५ टक्के या प्रमाणात असतात. ऑरगॉन हा वायू ०.९३ टक्के तर कार्बन-डाय-ऑक्साइड ०.०४ टक्के या प्रमाणात असतो. हायड्रोजन वायूचे प्रमाण ०.०१ टक्क्याहूनही कमी असते. वातावरणात वाफ व धूलिकणही अत्यल्प प्रमाणात असतात.
(२) वातावरणाच्या सर्वसाधारण स्थितीस ‘हवामान’ असे म्हणतात. पृथ्वीवर पडणारे सूर्यकिरण जरी सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असे असले तरी पृथ्वीचा पृष्ठभाग गोलाकार असल्याने ते पृथ्वीच्या काही भागांत अगदी सरळ किंवा लंब रेषेत पडतात; तर काही भागात तिरपे वा अतिशय तिरपे पडतात. विषुववृत्तावर सूर्यकिरण सरळ वा लंब पडत असल्याने विषुववृत्तापासून जसजसे दक्षिण वा उत्तरेकडे लांब जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते.
(३) विषुववृत्तापासूनचे अंतर हा हवामानावर परिणाम घडविणारा महत्त्वाचा घटक असला तरी विशिष्ट ठिकाणची समुद्रसपाटीपासूनची उंची, समुद्रापासून असलेले अंतर, उष्ण वा शीत जलप्रवाह यांचे सान्निध्य आदी घटकही हवामानावर प्रभावी परिणाम घडवितात.
आवर्त
(१) आवर्तामध्ये मध्यभागी कमी भाराचा प्रदेश असतो व आजूबाजूस जास्त भाराचे क्षेत्र असते.
(२) जास्त भाराकडून मध्यभागी असणाऱ्या कमी भाराच्या प्रदेशाकडे वारे चक्राकार गतीने फिरत एकत्र येतात, त्यांना ‘आवर्त’ असे म्हणतात.
(३) आवर्तातील वारे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात.
(४) भारतात या आवर्ताना ‘चक्रीवादळे’ तर चीनमध्ये ‘टायफून्स’, वेस्ट इंडीजमध्ये ‘हरिकेन्स’ व उत्तर अमेरिकेत ‘टोरनॅडो’ म्हणून संबोधले जाते.
प्रत्यावर्त
(१) प्रत्यावर्तामध्ये मध्यभागी जास्त भार व आजूबाजूस कमी भार असतो.
(२) मध्य भागाकडून आजूबाजूच्या मोठ्या क्षेत्राकडे वारे वाहतात. हवेची ही हालचाल आवर्ताप्रमाणे फारशी तीव्रतेने जाणवत नाही.
(३) प्रत्यावर्तातील वारे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात.
व्यापारी वारे: विषुववृत्तावर वर्षभर सूर्याचे किरण लंबरूप पडत असल्याने तेथील हवा तापून वर जाते. तिची जागा घेण्यासाठी आजूबाजूच्या प्रदेशांतून म्हणजे ३०० दक्षिण व उत्तर अक्षवृत्तांपासून विषुववृत्ताकडे थंड हवा सरकू लागते, तिला ‘व्यापारी वारे’ असे म्हणतात.
खारे वारे: 4 दिवसा जमीन समुद्राच्या पाण्यापेक्षा अधिक तापलेली असल्याने तेथील हवा वर जाते. साहजिकच, समुद्राकडील थंड हवा जमिनीकडे वाहू लागते, तिला ‘खारे वारे’ असे म्हणतात.
मतलई वारे: रात्री जमीन लवकर थंड होते पण समुद्राचे पाणी मात्र तापलेले असते, त्या वेळी जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहू लागतात. त्यांना ‘मतलई वारे’ असे म्हणतात.
औष्णिक कटिबंध
उष्ण कटिबंध: २३.५° उत्तर ते २३.५० दक्षिण असा पसरलेला कर्कवृत्त व मकरवृत्त यांमधील अतिउष्ण पट्टा.
समशीतोष्ण कटिबंध दोन्ही गोलार्धांतील २३.५० ते ६६.५० असे पसरलेले रुंद पट्टे.
शीत कटिबंध : दोन्ही गोलार्धातील ६६.५० अक्षवृत्ता-‘पलीकडील उत्तर वा दक्षिण ध्रुवापर्यंतचा प्रदेश.
समताप रेषा: पृथ्वीपृष्ठावरील तापमानाचे आडवे म्हणजे क्षितिज-समांतर वितरण दर्शविणाऱ्या काल्पनिक रेषांना ‘समताप रेषा’ (Isotherms) असे म्हणतात. समताप रेषांनी समान तापमान असणारी ठिकाणे जोडली जातात.
समभार रेषा: पृथ्वीपृष्ठावरील समान वायुभार असणारी ठिकाणे जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना ‘समभार रेषा’ (Isobars) असे म्हणतात.
समोच्चतादर्शक रेषा: पृथ्वीपृष्ठावरील समान उंची असणारी ठिकाणे जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना ‘समोच्चतादर्शक रेषा’ असे म्हणतात. नकाशात या रेषांच्या साहाय्याने भू-उठाव दाखविले जातात.
समक्षार रेषा: या काल्पनिक रेषा सागरातील पाण्याच्या क्षारतेचे वितरण दर्शवितात. समक्षार रेषांनी सागरजलाची समान क्षारता असलेली ठिकाणे जोडली जातात.
उत्तरायण: उत्तरायणास प्रारंभ म्हणजेच सूर्याचे उत्तरेकडे आभासी सरकणे. २२ डिसेंबर या दिवशी दक्षिण गोलार्धातील २३.५० वर (मकरवृत्तावर) सूर्याचे किरण लंबरूप पडतात. त्यानंतर सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो. याला ‘उत्तरायण’ असे म्हणतात.
दक्षिणायण: २१ जून रोजी सूर्य उत्तर गोलार्धात २३.५० वर (कर्कवृत्तावर) लंबरूप किरणांनी प्रकाशत असतो. त्यानंतर सूर्य दक्षिणेकडे सरकू लागतो. याला ‘दक्षिणायणा’चा प्रारंभ झाला, असे म्हणतात.
चांद्रमास: चंद्राला पृथ्वीप्रदक्षिणा करण्यास २७.३३ दिवस लागतात; परंतु एवढ्या अवधीत पृथ्वी आपल्या मार्गावर थोडी पुढे गेलेली असते. पृथ्वीसमोर बरोबर त्याच स्थितीत येण्यास चंद्राला आणखी पुढे सरकावे लागते; त्यामुळे चंद्राचा पृथ्वीप्रदक्षिणेचा काळ २९.५ दिवसांचा होतो, या काळास ‘चांद्रमास’ असे म्हणतात.
भू-खंडे: आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका या सात खंडांमध्ये पृथ्वीचा भाग विभागला गेला आहे. अंटार्क्टिका हा भूखंड बर्फाच्छादित आहे.
महासागर: पॅसिफिक (प्रशांत) महासागर, हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर व अंटार्क्टिक महासागर हे पृथ्वीवरील सात महासागर होत. यांपैकी पॅसिफिक हा सर्वांत विशाल महासागर आहे.
दिवस व रात्र: २१ मार्च (वसंत संपात) व २३ सप्टेंबर (शरद संपात) या दिवशी दिवस व रात्रीचा कालावधी समान म्हणजे १२-१२ तासांचा असतो. उत्तर गोलार्धात २२ डिसेंबर रोजी दिवस सर्वांत लहान तर रात्र सर्वांत मोठी असते. २१ जून रोजी रात्र सर्वांत लहान तर दिवस सर्वांत मोठा असतो.
Also Read