जैविक विविधता आणि पर्यावरणविषयक संस्था | Biodiversity and Environmental Organization in Marathi
भारतात पर्यावरणविषयक प्रयत्न बिगर सरकारी संस्थांमार्फत स्वातंत्र्याअगोदर सुरू झाले असले तरी पर्यावरण आणि वन या विभागांसाठी वेगळे मंत्रालय १९८० मध्ये निर्माण झाले. तसेच अनेक सरकारी संस्था आणि स्वायत्त संस्था पर्यावरणविषयक कामे करताना दिसतात. त्यांतील काही पुढीलप्रमाणे आहेत-
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण: वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ या अंतर्गत १९९२ मध्ये झालेल्या बदलानुसार केंद्रीय पातळीवर प्राणिसंग्रहालयांचे नियमन करणारी संस्था निर्माण झाली. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री असतात आणि १० सदस्य असतात. हे प्राधिकरण पुढील कामे करते-
- प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या राहण्यासाठी, पालनपोषणासाठी आणि वैद्यकीय सेवेसंबंधी मानके तयार करणे.
- कामगिरीचा आढावा घेऊन प्राणिसंग्रहालयांना मान्यता देणे.
- विनाशाच्या संकटात सापडलेल्या प्राण्यांच्या प्रजातींची माहिती घेऊन त्यांच्या प्रजननासाठी प्राणिसंग्रहालयात व्यवस्था करवून घेणे.
- प्रजननासाठी आवश्यक प्राण्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करवून घेणे.
- प्राणिसंग्रहालयांना संशोधन कामांसाठी तांत्रिक व वैज्ञानिक सल्ला देणे.
- प्राणिसंग्रहालयांना व्यवस्थापन आणि नियोजनासाठी मदत करणे.
वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII) या संस्थेची स्थापना सन १९८२ मध्ये झाली असून संस्थेचे मुख्यालय उत्तराखंडमधील डेहराडून येथे आहे. ही भारत सरकारच्या पर्यावरण व वनमंत्रालयाकडून चालविली जाणारी स्वायत्त संस्था आहे.

या संस्थेमध्ये पुढील कार्य चालते-
- जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव व्यवस्थापकांना संरक्षित क्षेत्राच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे.
- वन्यजीवांच्या नैसर्गिक निवासस्थानांमधील जमिनीचा वापर करण्यासंबंधी प्रशिक्षण देणे.
- वन्यजीव संशोधनाला मदत करणे आणि त्यात सुसूत्रता आणणे.
- वन्यजीव व्यवस्थापनाला लागणाऱ्या साधनांचा भारतीय परिस्थितीला अनुरूप विकास करणे.
- केंद्र सरकार व राज्य सरकारांना आणि स्वयंसेवी संस्थांना वन्यजीव संशोधन व व्यवस्थापनाच्या संबंधी सल्ला देणे.
- आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वन्य-जीवांसंबंधी सविस्तर माहितीकोश तयार करणे. या संबंधीच्या माहितीकोश प्रकल्पाची सुरुवात १९८८ मध्ये झाली. या प्रकल्पामध्ये राष्ट्रीय वन्यजीव माहितीकोश आणि माहिती पुरविणारी यंत्रणा यांचा समावेश आहे.
भारतीय वनस्पती सर्वेक्षण
(१) भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश प्रशासनाने व्यापारी उपयोगाच्या विविध वनस्पतींची लागवड करण्यासाठी वनस्पती उद्याने उभारली होती. त्यांतील काहींचा उद्देश ब्रिटिश वसाहतींना भेडसावणाऱ्या अन्नसमस्येवर तोडगा शोधण्याचे संशोधन करणे हा होता.
(२) या निरनिराळ्या वनस्पती संशोधन प्रकल्पांमध्ये सुसूत्रता आणण्याच्या हेतूने ब्रिटिश सरकारने १३ फेब्रुवारी, १८९० रोजी ‘भारतीय वनस्पती सर्वेक्षण’ (Botanical Survey of India) या संस्थेची स्थापना केली. कोलकात्याच्या रॉयल बोटॅनिकल गार्डनमधील माजी उद्यान अधीक्षक सर जॉर्ज किंग यांच्याकडे संचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
(३) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५४ मध्ये भारतीय वनस्पती सर्वेक्षणाची पुनर्रचना करण्यात आली. सन १९५७ मध्ये इंडियन बोटॅनिकल गार्डनमधील वनस्पतिसंग्रह (Herbarium) भारतीय वनस्पती सर्वेक्षणाच्या अखत्यारीत आला आणि त्याचे नामकरण ‘सेंट्रल नॅशनल हर्बेरियम’ असे करण्यात आले.
(४) भारतीय वनस्पती सर्वेक्षणाची भारतात ११ ठिकाणी प्रादेशिक केंद्रे आहेत. भारतातील वनस्पतींचे सर्वेक्षण करणे, त्यांची वर्गवारी करणे आणि संवर्धनाला आवश्यक ती माहिती मिळविणे ही कामे भारतीय वनस्पती सर्वेक्षण पार पाडते.
भारतीय प्राणी सर्वेक्षण
(१) स्वातंत्र्यपूर्व काळात १ जुलै, १९१६ रोजी तत्कालीन ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेल्या भारतातील प्राण्यांची माहिती गोळा करण्यासाठी ‘भारतीय प्राणी सर्वेक्षण’ (ZSI : Zoological Survey of India) या सरकारी संस्थेची स्थापना झाली. त्या अगोदरच्या काळात प्राणिविषयक संशोधनाचे काम कोलकात्या-च्या इंडियन म्युझियम (स्थापना १८७५) या ठिकाणी केले जात असे. त्या अगोदरच्या काळात म्हणजे १८१४-७५ या दरम्यान ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल’ या संस्थेकडील प्राणिविषयक संग्रह भारतीय प्राणी सर्वेक्षणाकडे आला. कोलकात्याला मुख्यालय असणाऱ्या या संस्थेची १६ प्रादेशिक कार्यालये आहेत.
(२) भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेचे मुख्य काम भारतातील प्राणिसंपदेची नोंदणी, वर्गीकरण व संग्रह करणे हे आहे. आता या संस्थेत प्राणिशास्त्रातील अनेक शाखांचा अभ्यास केला जात असला तरी अद्यापही सर्वेक्षणाच्या बरोबरीने प्राणी वर्गीकरणाच्या विज्ञानाचा अभ्यास हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. याखेरीज ही संस्था विनाशाच्या संकटात पडणाऱ्या प्राण्यांची यादी बनविण्याचे आणि प्राणिशास्त्रीय माहिती पुरविण्याचे केंद्र म्हणूनही कार्य करते. पर्यावरण आणि वन मंत्रालयाला गरज भासल्यास ही संस्था पर्यावरणातील बदलांचा अभ्यास करून तसा अहवाल सादर करते.
गोविंद वल्लभ पंत इन्स्टिट्यूट
(१) ‘गोविंद वल्लभ पंत इन्स्टिट्यूट’ ही १९८८ मध्ये स्थापन झालेली पर्यावरण आणि वनमंत्रालयाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे.
(२) या संस्थेचे मुख्यालय उत्तराखंडमध्ये अल्मोडा येथे असून ही संस्था हिमालयातील पर्यावरणाचा आणि विकासाचा विशेष अभ्यास करते.
इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अॅकॅडमी
(१) भारतीय वनसेवेमधील (आयएफएस) अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी असलेल्या इंडियन फॉरेस्ट कॉलेज या संस्थेचे रूपांतर १९८७ मध्ये अॅकॅडमीत करून संस्थेचे नामकरण इंदिरा गांधींच्या नावाने करण्यात आले.
(२) ही संस्था पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या अखत्यारीत असून ‘प्रशिक्षण’ हे संस्थेचे मुख्य कार्य आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी
(१) मुंबईची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही पर्यावरण विषयात काम करणारी भारतातील सर्वांत मोठी बिगर सरकारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना १८८३ मध्ये मुंबईला झाली. त्यानंतर १९२१ मध्ये संस्थेच्या ताब्यातील सजीवांच्या अवशेषांचा संग्रह ‘प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालया’कडे सुपुर्द करण्यात आला.
(२) संस्थेचा संग्रह आता हॉर्नबिल हाऊस या ठिकाणी असून हॉर्नबिल अथवा ‘धनेश’ हा मोठा पक्षी हे संस्थेचे बोधचिन्ह आहे.
(३) या संस्थेमध्ये डॉ. सलीम अली यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षितज्ज्ञ काम करीत असत.
(४) ही संस्था वन्यजीव, पर्यावरण आणि तत्संबंधी विषयांत संशोधनाचे काम गेली १३७ वर्षे सातत्याने करीत आहे.
नॅशनल रिसर्च सेंटर फॉर अॅग्रोफॉरेस्ट्री
(१) भारताच्या सुमारे एक तृतीयांश भागावर वनाच्छादन असावे ही अपेक्षा सन १९८८ मधील राष्ट्रीय वनधोरणामध्ये व्यक्त करण्यात आली होती. त्याला अनुसरून सुमारे ४३ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर वनीकरण करण्याची गरज भासत आहे. या वनीकरणामध्ये शेतीला पूरक आणि शेतीच्या परिसरात केलेल्या वनीकरणाचा मोठा वाटा असणार आहे. त्या कामी पद्धतशीर संशोधन करण्याच्या हेतूने १९८८ मध्ये उत्तर प्रदेशातील झाशी येथे ‘नॅशनल रिसर्च सेंटर फॉर अॅग्रोफॉरेस्ट्री’ ही संस्था स्थापन करण्यात आली; नंतर या संस्थेचे नाव ‘सेंट्रल अॅग्रोफॉरेस्ट्री रिसर्च इन्स्टिट्यूट’ (CAFRI) असे बदलण्यात आले.
(२) शेतमळे, पडीक जमीन वगैरे क्षेत्रांमध्ये वनशेती करण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास करणे, वनशेतीसंदर्भात मूलभूत संशोधन करणे, प्रशिक्षणाची व्यवस्था करणे आणि विविध प्रकारच्या वनशेती प्रकल्पांची आखणी करणे ही या संस्थेची मुख्य उद्दिष्टे आहेत.
(३) सन २००० मधील राष्ट्रीय शेती धोरणात वनशेतीला असणारे महत्त्व लक्षात घेऊन वनशेतीच्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याचे काम ही संस्था करीत आहे.
हिमालयन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट
(१) हिमालयातील जंगलांचा विशेष अभ्यास करण्याचे काम शिमल्याची हिमालयन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट करते. या संस्थेच्या कार्यक्षेत्रात हिमाचल प्रदेश व जम्मू आणि काश्मीर (विभाजनपूर्व) ही दोन राज्ये येतात.
(२) समशीतोष्ण कटिबंधातील नैसर्गिक वनांचे पुनरुज्जीवन करणे, अतिशीत वाळवंटी भागामध्ये पर्यावरणविषयक संशोधन करणे, वनक्षेत्र नष्ट झालेल्या भागातील परिसंस्था पुन्हा निर्माण करणे व वनीकरण प्रकल्पांसाठी आवश्यक संशोधन करणे ही या संस्थेची मुख्य उद्दिष्टे आहेत.
(३) संस्थेने सिल्व्हर फर आणि स्प्रूस या दोन वृक्षांच्या कृत्रिम पुनरुज्जीवनाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. तसेच हॉर्स चेस्टनट, बर्डचेरी, मेपल, पोप्लार आणि ओक अशा वृक्षांच्या रोपवाटिकेत वाढीसाठी आवश्यक संशोधन केले आहे.
अॅरिड फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट
(१) भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या अखत्यारीतील इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अॅण्ड एज्युकेशनच्या वतीने राजस्थानातील जोधपूर येथे ‘अॅरिड फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट’ची स्थापना करण्यात आली आहे.
(२) भारतात सुमारे ३२.७ दशलक्ष हेक्टर क्षेत्रफळ म्हणजे देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या १२ टक्के भू-भाग शुष्क (अॅरिड) प्रदेशात मोडतो.
(३) कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, हरियाना, आंध्र प्रदेश या राज्यांमधील शुष्क प्रदेशात कमी पाऊस, कोरडी हवा, वेगवान वारे, कमी प्रतीची जमीन आणि सततचे अवर्षण यांमुळे गंभीर आर्थिक-सामाजिक संकटे उभी राहतात. या भागांमध्ये वनीकरण करण्याच्या कार्यक्रमांना आवश्यक वैज्ञानिक ज्ञान आणि तंत्रज्ञान यांवर संशोधन करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
(४) शुष्क प्रदेशात वनीकरणासाठी उपयुक्त प्रजातींच्या प्रजननावर आणि संगोपन तंत्रावर येथे विशेष संशोधन केले जाते.
वनसंशोधन संस्था
(१) वनसंपदेच्या क्षेत्रात डेहराडूनची ‘वनसंशोधन संस्था’ (Forest Research Institute) ही अतिशय जुनी आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९०६ मध्ये झाली.
(२) गेल्या जवळजवळ ११४ वर्षांच्या इतिहासात संस्थेने वनसंशोधनाला वैज्ञानिक पायावर उभे केले आहे. डिसेंबर, १९९१ मध्ये या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे.
(३) संस्थेच्या चौदा विभागांमध्ये संशोधन आणि विकासाशी निगडित अध्यापन केले जाते. या संस्थेने गेल्या दहा दशकांच्या कालावधीत अनेक प्रकल्पांत लक्षणीय यश मिळविले आहे.
(४) वनवृक्षविज्ञान (सिल्व्हिकल्चर) या क्षेत्रात संस्थेने भरीव कामगिरी केली असून सुमारे ५५० प्रजातींच्या संगोपन-संवर्धनाविषयी महत्त्वाचे कार्य केले आहे. जवळजवळ ८० वनवृक्ष प्रजातींच्या बियांसंबधी संस्थेने महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. तसेच भारताखेरीज भूतान, पाकिस्तान, म्यानमार, नेपाळ, बांगलादेश यांच्यात आढळणाऱ्या वनांचा अभ्यास करून संस्थेच्या वैज्ञानिकांनी वनांचे वर्गीकरण केले आहे.
(५) संस्थेने वनोत्पादनांच्या क्षेत्रात संशोधन केले असून लाकूड सोडून इतर बनोत्पादनांबाबत अनेक नवीन पद्धती विकसित केल्या आहेत. खैरापासून कात मिळविणे, सुगंधी द्रव्ये मिळविण्याचे तंत्र, टर्मिनालिया वृक्षांच्या सालीमधून ऑक्सॅलिक अॅसिड मिळविणे अशा अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांत संस्थेने संशोधन केले आहे.
(६) संस्थेच्या वनस्पतिसंग्रहात ३ लाखांपेक्षा जास्त वनस्पती नमुन्यांमुळे हा संग्रह अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय ठेवा बनला आहे. तसेच देशपरदेशांतील लाकडांचे १८,००० पेक्षा जास्त नमुने संस्थेच्या लाकूडसंग्रहात आहेत.