ऊर्जासाधनांचे जागतिक वितरण | Global distribution of energy resources in Marathi

ऊर्जासाधनांचे जागतिक वितरण | Global distribution of energy resources in Marathi

दगडी कोळसा

देशाच्या आर्थिक व औद्योगिक विकासात दगडी कोळसा या ऊर्जासाधनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कोळशात असणारे कार्बनचे प्रमाण व त्याची उष्णता देण्याची क्षमता यावरून त्याचे पुढीलप्रमाणे प्रकार पाडण्यात येतात-

(१) पीट: हा सर्वांत कमी प्रतीचा कोळसा असून यात कार्बनचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी असते. हा कोळसा जळताना धूर निघतो व उष्णताही कमी मिळते. ज्वलनानंतर राख मोठ्या प्रमाणात राहते. याचा उपयोग घरगुती वापरासाठी केला जातो.

(२) लिग्नाइट: हा हलक्या प्रतीचा दगडी कोळसा असून यात कार्बनचे प्रमाण ४० टक्के असते. हा कोळसा ठिसूळ असतो. हा कोळसा जळताना धूर फार निघतो व उष्णता कमी मिळते. याचा उपयोग वीजनिर्मितीसाठी केला जातो. या कोळशापासून अशुद्ध तेल, गॅस, डांबर, मेण इत्यादींची निर्मिती केली जाते.

(३) विट्युमिनस: यात कार्बनचे प्रमाण ७० ते ८० टक्के असते. हा कोळसा लवकर पेट घेतो व लवकर विझतो. जळताना धुराचे प्रमाण कमी असते. राखही कमी प्रमाणात पडते. याचा उपयोग कोक तयार करण्यासाठी होतो. लोखंड वितळविण्यासाठी कोकचा वापर केला जातो. जागतिक कोळशाच्या उत्पाद‌नापैकी ८० टक्के कोळसा या प्रकारचा असतो.

(४) अँथ्रासाइट: हा सर्वांत उच्च प्रतीचा कोळसा आहे. यात कार्बनचे प्रमाण सुमारे ९५ टक्के असते. हा काळा, जड व चकाकणारा कोळसा आहे. हा कोळसा लवकर पेटत नाही पण एकदा पेटला की भरपूर उष्णता देतो. जळताना त्याचा धूर होत नाही. ज्वलनानंतर याची राख कमी राहते. हा कोळसा उत्तम इंधन म्हणून उपयुक्त आहे.

दगडी कोळशांचे प्रमुख उत्पादक म्हणून खालील देशांचा उल्लेख करता येईल-

(१) चीन: ग्लोबल एनर्जी स्टॅटिस्टिकल इयरबुक, २०२१ अनुसार दगडी कोळशाच्या उत्पादनात चीनचा जगात प्रथम क्रमांक लागतो. सन २०२० मध्ये चीनमध्ये कोळशाचे वार्षिक उत्पादन ३७४.३ कोटी टन असून ते जगाच्या एकूण उत्पादनाच्या ४९ टक्के इतके आहे. या देशात कोळशाचे साठे विखुरलेल्या स्वरूपात आढळतात.

फुशून, फुन्सीन, कैलान व होकँग विभागात प्रमुख कोळसाक्षेत्रे आहेत. कोकसाठी लागणारा उत्तम प्रतीचा कोळसा या भागात मिळतो. याशिवाय सिचुआन, युनान, क्विचाऊ, कियांगसी व ह्युनानमध्ये कोळशाचे साठे आहेत.

(२) भारत: कोळसा उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. सन २०२० मध्ये देशातील कोळशाचे वार्षिक उत्पादन सुमारे ७७.९ कोटी टन होते. जागतिक उत्पादनाच्या ९.९४ टक्के उत्पादन भारतात होते.

(३) संयुक्त संस्थाने: कोळसा उत्पादनात संयुक्त संस्थानांचा जगात चौथा क्रमांक आहे. सन २०२० मध्ये या देशातील कोळशाचे वार्षिक उत्पादन सुमारे ४८.८ कोटी टन इतके असून ते जागतिक उत्पादनाच्या २४ टक्के इतकी घट झाली आहे.

या देशातील कोळसा उत्पादक क्षेत्रे पुढीलप्रमाणे-

  • अॅपेलेशियन पर्वतीय क्षेत्र: हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे असून या देशातील कोळसा उत्पादनापैकी सुमारे ७० टक्के उत्पादन याच क्षेत्रातून होते.
  • अंतर्गत क्षेत्र: या क्षेत्रात बिट्युमिनस प्रकारचा दगडी कोळसा सापडतो. हा प्रदेश ह्युरॉन सरोवरापासून इंडियाना, इलिनॉईस, आयोवा, मिसुरी, कॅन्सास, ओक्ला-होमा व आरकान्सा राज्यापर्यंत पसरलेला आहे.
  • रॉकी पर्वतीय क्षेत्र: यामध्ये कोलोरेंडो, न्यू-मेक्सिको, उटाह, व्योमिंग, मोंटाना, अॅरिझोना, इडाओ या राज्यांचा समावेश होतो. या भागात बिट्युमिनस प्रकारचा कोळसा मिळतो, परंतु, हे प्रदेश दुर्गम असून प्रमुख औद्योगिक क्षेत्र व बाजारपेठेपासून दूर आहेत. त्यामुळे यांतील फार थोड्या खाणींतून उत्पादन होते.
  • याशिवाय टेक्सास, अलाबामा या राज्यांत लिग्नाइटचे साठे आहेत. पॅसिफिकच्या किनाऱ्यावर वॉशिंग्टन, ऑरेगॉन व कॅलिफोर्निया राज्यांतही थोडे कोळशाचे साठे आहेत.

(४) ऑस्ट्रेलिया: या देशात न्यू साऊथ वेल्स, क्विन्सलंड, साऊथ ऑस्ट्रेलिया व व्हिक्टोरिया या विभागांत कोळसा मिळतो. क्विन्सलंड व न्यू साऊथ वेल्स या भागांत बिट्युमिनस प्रकारच्या कोळशाचे साठे सापडतात, तर व्हिक्टोरिया व साऊथ ऑस्ट्रेलिया भागांत लिग्नाइट प्रकारच्या कोळशाचे साठे आढळतात. सन २०२० मध्ये जागतिक उत्पादनाच्या ६.६५ टक्के इतके उत्पादन ऑस्ट्रेलियात झाले असून कोळसा उत्पादनात ऑस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर आहे.

(५) इंडोनेशिया: कोळसा उत्पादनात या देशाचा जगात तिसरा क्रमांक लागतो. या देशातील सन २०२० मधील कोळशाचे वार्षिक उत्पादन ५५.१ कोटी टन असून ते जागतिक उत्पादनाच्या ७.७५ टक्के इतके आहे.

(६) ग्रेट ब्रिटन: जगात कोळशाचे उत्पादन व कोळशाचा ऊर्जेसाठी वापर प्रथम या देशातच करण्यात आला. सन २०२० मध्ये जगातील एकूण कोळसा उत्पादनापैकी ०.०२ टक्के इतके अत्यल्प उत्पादन या देशात झाले. या देशातील कोळसाक्षेत्रे पेनाईन पर्वताच्या दोन्ही बाजूस पसरलेली आहेत. डरहॅम, यॉर्कशायर,
डर्बी, लॅकेशायर, केबरलँड या विभागांत कोळशाच्या महत्त्वाच्या खाणी आहेत.

खनिज तेल: प्राचीन काळी भूहालचालींमुळे भूस्तराखाली प्राणी व वनस्पती गाडल्या गेल्या. त्यावर प्रचंड दाब पडला. त्यामुळे उष्णतेची निर्मिती होऊन वनस्पती व प्राणी यांचे कुजून विघटन झाल्यामुळे खनिज तेल निर्माण झाले, खनिज तेल हे कार्बन व हायड्रोजन या दोन मूलद्रव्यांच्या संयोगाने बनले आहे.

खनिज तेलाचे जागतिक वितरण व उत्पादन यांची माहिती पुढीलप्रमाणे देता येईल-

(१) संयुक्त संस्थाने: ग्लोबल एनर्जी स्टॅटिस्टिकल इयरबुक, २०२१ अनुसार, जागतिक खनिज तेल उत्पादनात या देशाचा जगात प्रथम क्रमांक लागतो. सन २०२० मध्ये देशात खनिज तेलाचे एकूण ७२.२ कोटी टन उत्पादन झाले असून ते जागतिक उत्पादनाच्या २२.६८ टक्के इतके आहे. या देशातील खनिज तेलक्षेत्रे पुढीलप्रमाणे-

  • अप्लेशियन क्षेत्र: या क्षेत्रालाच पूर्वेकडील तेलक्षेत्र म्हणतात. हे क्षेत्र पेनसिल्व्हानिया, पूर्व ओहिओ, न्यूयॉर्क, पश्चिम व्हर्जिनिया, केंटुकी, इलिनॉइस, इंडियाना व मिशिगन राज्यांत आहे. येथील खनिज तेलात गंधकाचे प्रमाण कमी असते; तसेच तेलाचा दर्जा उत्तम प्रतीचा असल्याने येथील उत्पादनास आर्थिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.
  • मध्यवर्ती क्षेत्र: मिसिसिपी नदीला समांतर दक्षिणोत्तर असा खनिज तेलाचा एक पट्टा संयुक्त संस्थानांच्या मध्यवर्ती प्रदेशातून गेलेला आहे. यात कान्सास, ओक्लाहामा, टेक्सास, लुझियाना या प्रांतांचा समावेश होतो, या प्रदेशात देशातील सर्वांत जास्त म्हणजे सुमारे ५० टक्के तेलसाठा आहे.
  • गल्फ किनारपट्टीचे क्षेत्र : गल्फच्या आखाता- पासून ८० कि. मी. अंतरावर सुमारे १००० कि.मी. क्षेत्रफळाच्या परिसरात अनेक तेलविहिरी आहेत. मिसिसिपी, टेक्सास, लुझियाना या प्रांतांच्या दक्षिणेकडील भाग या क्षेत्रात समाविष्ट होतो. गॅसोलिन व सल्फरचे उत्पादन या प्रदेशात काढले जाते.
  • रॉकी पर्वतीय क्षेत्र: या क्षेत्रात कोलोरेंडो, न्यू मेक्सिको, उटाह, मोंटाना, व्योमिंग या राज्यांचा समावेश होतो.
  • कॅलिफोर्निया क्षेत्र: पॅसिफिक किनाऱ्या-जवळील कॅलिफोर्निया राज्यात लॉस एंजल्सच्या प्रदेशात व दक्षिण सन-जोआ क्विन खोऱ्यात तेल उत्पादन होते. वरील खनिज तेल उत्पादक क्षेत्रांशिवाय इंडियाना, इलिनॉय, मिशिगन व ओहिओ प्रांतातही खनिज तेलाचे उत्पादन होते.

(२) सौदी अरेबिया: जागतिक खनिज तेल उत्पादनात या देशाचा जगात तिसरा क्रमांक लागतो. सन २०२० मध्ये देशातील खनिज तेलाचे उत्पादन ५०.८ कोटी टन झाले असून ते जागतिक उत्पादनाच्या १६ टक्के इतके आहे. देशातील सर्व तेलक्षेत्रे पर्शियाच्या आखाताजवळ आहेत. येथील धावर क्षेत्र जगातील खनिज तेल साठ्याचे एक विस्तृत क्षेत्र समजले जाते. दम्मन, कूतिफ, सफीयाना ही या देशातील अन्य महत्त्वाची खनिज तेलक्षेत्रे होत. ट्रान्स अरेबियन नलिकांद्वारे भूमध्य समुद्र किनाऱ्यापर्यंत तेल वाहन नेले जाते.

(३) रशिया: जागतिक खनिज तेल उत्पादनात या देशाचा जगात दुसरा क्रमांक लागतो. सन २०२० मध्ये देशातील एकूण खनिज तेल उत्पादन ५१.२ कोटी टन झाले असून ते जागतिक उत्पादनाच्या १६.०८ टक्के इतके आहे. सन १९३० मध्ये कॉकेशस पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या बाकू प्रदेशात खनिज तेलाच्या उत्पादनाला सुरुवात झाली. या प्रदेशाच्या उत्तरेस ग्रॉझनी व मेकॉप ही तेलक्षेत्रे आहेत. सन १९५० पासून व्होल्गा व उरलमध्येही खनिज तेलाचे उत्पादन होत आहे. उझबेकिस्तानमधील फरगणा खोऱ्यात, कॅस्पियन समुद्राच्या पूर्व भागात, टोम्स्क व साखलीन बेटांमध्येही खनिज तेलाचे उत्पादन होते.

(४) कॅनडा: या देशाचा खनिज तेल उत्पादनात जगात चौथा क्रमांक लागतो. सन २०२० मध्ये देशात खनिज तेलाचे एकूण उत्पादन २५.५ कोटी टन असून ते जागतिक उत्पादनाच्या ८.०१ टक्के इतके आहे.

(५) इराक: जागतिक खनिज तेल उत्पादनात या देशाचा जगात पाचवा क्रमांक लागतो. सन २०२० मध्ये देशातील खनिज तेलाचे एकूण उत्पादन २०.६ कोटी टन असून ते जागतिक उत्पादनाच्या ६.४७ टक्के इतके आहे. वरील खनिज तेल उत्पादक क्षेत्रांशिवाय इंडियाना, इलि-नॉय, मिशिगन व ओहिओ प्रांतातही खनिज तेलाचे उत्पादन होते.

(६) इराण: या देशाचा खनिज तेल उत्पादनात (२०२० मधील उत्पादन : १३.३ कोटी टन) जगात नववा क्रमांक लागतो. जागतिक तेल उत्पादनाच्या ४.१७ टक्के उत्पादन या देशात होते. या देशातील महत्त्वाची तेलक्षेत्रे नैऋत्य भागात आहेत. मस्जिद-ए-सुलेमान, नफत ई-शाह, लाली अगाजारी व बर्गन ही या देशातील महत्त्वाची तेलक्षेत्रे होत.

  • रूमानिया, इंडोनेशिया, नायजेरिया, मेक्सिको, म्यानमार, इजिप्त, सिरिया, लिबिया, पाकिस्तान, जपान, जर्मनी, फ्रान्स, हंगेरी, नॉर्वे, ग्रेट ब्रिटन इत्यादी देशांतही काही प्रमाणात खनिज तेलाचे उत्पादन होते.
  • सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत, कतार, रशिया, इजिप्त, व्हेनेझुएला हे देश खनिज तेल निर्यात करतात.
  • भारत, संयुक्त संस्थाने, जपान आणि युरोपमधील देश खनिज तेलाचे प्रमुख आयातक होत.

अणुशक्ती (अणुऊर्जा)

आधुनिक काळात हे अत्यंत महत्त्वाचे शक्तिसाधन ठरले आहे. अणुशक्ती ही युरेनिअम, थोरिअम, प्लुटोनिअम, रेडिअम, लिथिअम या किरणोत्सर्गी खनिजांपासून तयार करता येते. या खनिजातील अणूंचे विघटन करून अणुशक्ती मिळविता येते. अणू ज्या वेळी विभागले जातात व अणूंच्या रचनेत बदल होतो त्या वेळेस फार मोठी शक्ती उष्णतेच्या रूपाने बाहेर पडते. ही उष्णता वाफ निर्माण करण्यासाठी वापरली जाते. या वाफेच्या साहाय्याने वीज निर्माण करण्यात येते. अणुशक्तीसाठी लागणारी खनिजे कमी प्रमाणात वापरूनही त्यातून प्रचंड प्रमाणात शक्ती निर्माण होते. अणुशक्ती मिळविण्यासाठी लागणाऱ्या खनिजांपैकी युरेनिअम हे फार महत्त्वाचे खनिज आहे. १०० टन दगडी कोळशापासून जेवढी ऊर्जा मिळते तेवढी ऊर्जा फक्त २८ ग्रॅम युरेनिअमपासून मिळते.

युरेनिअमचे साठे फारच मर्यादित प्रदेशात आढळतात. युरेनिअम उत्पादनाच्या बाबतीत कॅनडा, संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, फ्रान्स, नायजर, दक्षिण आफ्रिका, स्पेन, भारत, पोर्तुगाल, अर्जेंटिना हे देश अत्यंत महत्त्वाचे आहेत. याशिवाय रशिया, युगोस्लाव्हिया, जर्मनी, ब्राझील, पाकिस्तान, काँगो हे देशही युरेनिअमचे थोड्याफार प्रमाणात उत्पादन करतात. युरेनिअमच्या उत्पादनाचा विचार करता कझाकस्तान हा देश प्रथम क्रमांकावर असून जागतिक युरेनिअम उत्पादनापैकी ४२.५१ टक्के उत्पादन या देशात होते. युरेनिअमच्या उत्पादनात कॅनडा हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २०१९ मध्ये ६,९३८ टन युरेनिअमचे उत्पादन या देशात झाले असून ते जागतिक उत्पादनाच्या १२.९३ टक्के इतके होते.

ऑस्ट्रेलिया हा युरेनिअमच्या उत्पादनात जगात तिसऱ्या क्रमांकावर असून सन २०१९ मध्ये या देशात युरेनिअमचे एकूण उत्पादन ६,६१३ टन इतके झाले. ते जागतिक उत्पादनाच्या १२.३२ टक्के इतके होते. नामिबियात जागतिक उत्पादनाच्या १०.२१ टक्के, नायजरमध्ये ५.५६ टक्के, रशियामध्ये ५.४३ टक्के, उझबेकिस्तानमध्ये ४.४८ टक्के, चीनमध्ये ३.५१ टक्के, युक्रेनमध्ये १.४९ टक्के तर संयुक्त संस्थानांत ०.१३ टक्के इतके युरेनिअमचे उत्पादन होते. थोरिअम हा धातू मोनाझाईटमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. संयुक्त संस्थाने, ब्राझील, भारत, दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये थोरिअम मोठ्या प्रमाणात सापडते. संयुक्त संस्थानांतील फ्लोरिडा किनारपट्टीवर जक्सव्हिलेजवळ, दक्षिण आफ्रिकेत किनारपट्टीवर नद्यांच्या खोऱ्यांत आणि ब्राझीलमध्ये रिओ-डी-जानिरो ते बईचा पर्वत या दरम्यान मोठ्या प्रमाणात हे खनिज सापडते. भारतात मलबार व केरळ किनारपट्टीलगत तसेच त्रावणकोर येथेही थोरिअम मोठ्या प्रमाणात सापडते.

याशिवाय कॅनडा, ऑस्ट्रेलिया, रशिया, श्रीलंका, ग्रॅबॉन व फ्रान्समध्येही थोड्या प्रमाणात थोरिअमचे उत्पादन होते. अणुशक्तीचा वापर ऊर्जानिर्मितीसाठी करता येतो. पाणबुड्या, उपग्रह प्रक्षेपक आणि क्षेपणास्त्रांसारख्या संरक्षणसाधनांतही अणुशक्तीचा उपयोग केला जातो. अणुशक्तीच्या निर्मितीत संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन, जपान हे देश आघाडीवर आहेत. याशिवाय फ्रान्स, जर्मनी, रशिया व रशियन राष्ट्रकुलातील देश, कॅनडा, इटली, स्वीडन, भारत इत्यादी देशांतही अणुऊर्जा तयार होते.

Also Read

Natural divisions of the world in Marathi

नमस्कार! मी रोहित म्हात्रे. सामान्य ज्ञान विषय शिकवण्याचा मला विशेष अनुभव आहे. कठीण गोष्टी सहजतेने समजावणे हेच माझं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या माध्यमातून सक्षम बनवणे हेच माझं ध्येय आहे.

Leave a Comment