जगातील मुख्य शेती प्रकार | The main types of agriculture in the world in Marathi
शेती (कृषी) हा मानवाचा प्राचीन काळापासून एक प्रमुख व्यवसाय आहे. प्रत्येक शेतीपद्धतीची वैशिष्ट्ये भिन्न स्वरूपाची असल्याने त्या भिन्न प्रकारच्या वैशिष्ट्यांवर आधारित शेतीचे प्रकार पुढीलप्रमाणे पाडण्यात येतात.
स्थलांतरित शेती
पर्वतीय प्रदेश, अरण्ये अशा दुर्गम प्रदेशांतील आदिवासी जमाती जंगले तोडून, जाळून शेती करतात आणि जमिनीचा कस कमी झाल्यावर स्थलांतर करतात, त्यास ‘अस्थायी’ किंवा ‘स्थलांतरित शेती’ असे म्हटले जाते.
शेतीसाठी अरण्यातील योग्य जागा निवडून, त्या जागेवरील झाडे, वनस्पती तोडून, जाळून ती जागा शेतीसाठी तयार केली जाते. आदिवासी लोक परंपरागत पद्धतीने स्थलांतरित शेती करतात. हे लोक मागासलेले असल्यामुळे त्यांची शेतीची अवजारे जुनाट पद्धतीची असतात. या प्रकारच्या शेतीत योग्य ती मशागत केली जात नाही. पिकांची आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. या शेतीपद्धतीत शेतांचे आकार लहान असतात. ही शेती मुख्यतः उष्ण कटिबंधातील पर्वतीय, डोंगराळ व अरण्यव्याप्त प्रदेशांत केली जाते. दक्षिण अमेरिका, आफ्रिका व आग्नेय आशियातील विषुववृत्तीय प्रदेशात शेतीचा हा प्रकार विशेष प्रचलित आहे. या प्रकारची शेती जगातील वेगवेगळ्या भागांत निरनिराळ्या नावांनी ओळखली जाते. भारतात ही शेती झूम (आसाम), पोणम (केरळ), पाडू (ओडिशा), बेवार (मध्य प्रदेश) या नावांनी ओळखली जाते. या शेतीस श्रीलंकेत चेन्ना, आफ्रिकेत मिल्पा, ब्राझीलमध्ये रोका, फिलिपाइन्समध्ये केनगिन, इंडोनेशियात लडांग, म्यानमारमध्ये टुंग्या अशी नावे आहेत. अशा शेतीतून अन्नधान्ये, कंदमुळे, भाजीपाला, फळे वगैरेंचे उत्पादन घेतले जाते. या शेतीतून मिळणारे उत्पादन फारच कमी असते. केवळ उदरनिर्वाहासाठी ही शेती केली जाते. या प्रकारच्या शेतीमुळे जंगलांचे नुकसान होते. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होते. दिवसेंदिवस या शेतीचे महत्त्व कमी होत आहे. कारण, बऱ्याच देशांतील शासनांनी अरण्यांच्या तोडीवर बंधने घातली आहेत.
सखोल शेती
दाट लोकवस्तीच्या प्रदेशात, सुपीक जमिनीत, प्राणी व मनुष्यबळाच्या साहाय्याने; परंतु मर्यादित भांडवलाचा उपयोग करून, परंपरागत अवजारांच्या साहाय्याने केल्या जाणाऱ्या शेतीस ‘सखोल’ किंवा ‘सधन’ शेती म्हणतात. अशा प्रकारच्या शेतीतून दरहेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन मिळविले जाते, हेही या ठिकाणी लक्षात घेणे अगत्याचे आहे.
सखोल शेती उष्ण कटिबंधातील आशिया खंडातील मान्सून हवामानाच्या प्रदेशात केली जाते. दाट लोकवस्तीच्या प्रदेशात ही शेती केली जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे दर पिढीगणिक शेतजमिनीचे विभाजन होत असल्याने शेतांचा आकार लहान असतो. शेतजमिनीची टंचाई असल्याने जमिनीचा छोटासा तुकडादेखील लागवडीखाली आणला जातो. पायऱ्यापायऱ्यांची शेती करून डोंगरउतारही उपयोगात आणला जातो. लहानशा जमिनीची अतिशय काळजीपूर्वक मशागत केली जाते. खतांचा वापर करून, पिकांची अदलाबदल करून वा एकाच वेळी अनेक पिके घेऊन जमिनीचा कस वाढविण्याचे प्रयत्न सातत्याने केले जातात. या प्रकारच्या शेतीतील कामे अतिशय जिकिरीची व कष्टप्रद असतात. त्यासाठी भरपूर मनुष्यबळाची आवश्यकता असते. जमीन नांगरण्यासाठी व शेतीतील इतर प्रक्रियांसाठी पाळीव प्राण्यांचादेखील उपयोग केला जातो. मशागतीसाठी परंपरागत व जुनाट पद्धतीची अवजारे वापरली जातात. ही शेती करणारा शेतकरी गरीब असल्याने शेतीत भांडवलाचा वापर कमी होतो. तांदूळ हे सखोल शेतीतील महत्त्वाचे पीक आहे. शिवाय गहू, ज्वारी, बाजरी, कडधान्ये व गळिताच्या धान्यांचेही उत्पादन घेतले जाते. या शेतीप्रकारात दरहेक्टरी शेतीचे उत्पादन जास्त असते, पण दरडोई उत्पादन मात्र कमी असते. मान्सून प्रदेशातील दाट लोकसंख्येमुळे या शेतीतील उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर जाऊ शकत नाहीत. ही शेती प्रामुख्याने उदरनिर्वाहासाठीच केली जाते.
मळ्याची शेती
ज्या मोठमोठ्या शेतांत प्रामुख्याने नगदी पिके पिकविली जातात, त्या शेतीला ‘मळ्याची शेती’ असे संबोधितात. युरोपियन लोकांनी आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत आपल्या वसाहती स्थापन केल्या तेव्हा वसाहतीत या प्रकारच्या शेतीला सुरुवात केली.
“A Plantation agriculture may be defined as a large agricultural unit, owned by private individuals, corporations or a state. It is characteristically highly capitalized, makes use of a large amount of native or cheap imported labour and produces a cash crop usu-ally a specialised kind.” या शब्दांत हॅरिस रॉबिन्सन यांनी मळ्याच्या शेतीची व्याख्या दिली आहे.
या प्रकारात शेतांचा आकार मोठा असतो. त्यांचा सर्वसाधारण आकार ४० ते ४०० हेक्टर्सचा असतो. मळे खाजगी मालकीचे, महामंडळाच्या मालकीचे, सहकारी संस्थेच्या मालकीचे अथवा सरकारी मालकीचे असतात. या शेतीसाठी भरपूर भांडवलाची आवश्यकता असते. उत्तम प्रकारचे बी-बियाणे, यांत्रिक अवजारे, कीटकनाशके, खते, पाणीपुरवठा यांसाठी खूप खर्च येतो. शिवाय मळ्यांतून व्यापारी स्वरूपाचे उत्पादन सुरू होण्यास ५ ते ६ वर्षांचा कालावधी लागतो. तंत्रज्ञ, मजूर व व्यवस्थापनावरही बराच खर्च करावा लागतो, त्यामुळे मळ्याच्या शेतीसाठी भांडवल खूप लागते. मळ्याच्या शेतीची कामे करण्यासाठी कुशल, अनुभवी व स्वस्त मजुरांची जरुरी असते. स्थानिक मजूर उपलब्ध नसतील तर दुसरीकडून मजूर आणावे लागतात. चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कोको, रबर, फळे, ऊस यांसारखे एकच पीक या शेतीतून घेतले जाते. अशा पिकाच्या उत्तम प्रतीच्या किंवा विशेष जातीचीच मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मळ्याच्या शेतीत यांत्रिक पद्धतीचा वापर अधिक प्रमाणावर केला जातो. उत्कृष्ट बी-बियाणे व कीटकनाशके यांचा वापर केला जातो. या शेतीचे व्यवस्थापन हे उत्तम दर्जाचे व सुसंघटित असते. स्वतंत्र व्यवस्थापन, संशोधन केंद्रे व प्रयोगशाळांची व्यवस्थासुद्धा मळ्याच्या शेतीकरिता केलेली असते.
मळ्याच्या शेतीतील पिकांना उष्ण हवामानाची आवश्यकता असल्याने या प्रकारची शेती प्रामुख्याने उष्ण कटिबंधातील भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया, ब्राझील यांसारख्या देशात केली जाते. मळ्याची शेती व्यापारी तत्त्वावर केली जात असल्याने मळ्याच्या शेतीची उत्पादने निर्यात करणाऱ्या देशांना भरपूर परकीय चलन मिळते.
मळे शेतीतील समस्या
मळे पर्वतउतारावर असल्यामुळे, अतिवृष्टीमुळे जमिनीची धूप होऊन तेथील मृदा नापीक बनते; तसेच एकाच जमिनीतून एकच पीक वारंवार घेतल्यानेही जमिनीचा कस कमी होतो. वृक्ष तोडून मळ्याची जमीन तयार केल्यावर नको असलेली वनस्पती सतत वाढत राहते. उष्ण आणि आर्द्र हवामानामुळे पिकांवर अनेक रोगांचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव होतो. या प्रदेशात अरण्ये तोडून वस्त्या, रस्ते आणि रेल्वेमार्ग करावे लागतात; त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. उष्ण व दमट हवामानामुळे येथील मजुरांना अनेक प्रकारचे रोग होतात आणि त्यामुळे ते दिवसातील जास्त काळ काम करू शकत नाहीत. अशा तन्हेने या प्रदेशातील अनेक समस्या येथील हवामानामुळेच निर्माण झालेल्या आहेत.
पूर, चक्रीवादळे, थंडीच्या किंवा उष्णतेच्या लाटा यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मळ्यांचे फार नुकसान होते. एकाच पिकावर मळेवाल्यांची अर्थव्यवस्था केंद्रित झालेली असल्याने असे नुकसान पेलणे अवघड जाते. मळ्यांची शेती करताना बऱ्याच वेळा स्थानिक मजुरांचे सहकार्य व्यवस्थित मिळत नाही. अशा वेळी दुसरीकडून किंवा परदेशातून मजूर आणावे लागतात. त्यामुळे स्थानिक मजूर व दुसरीकडून आलेले मजूर यांच्यात सामाजिक संघर्ष निर्माण होतात. त्यातून कधी कधी राजकीय संघर्षदेखील उद्भवतात. मळ्यांच्या शेतीतून होणाऱ्या एकाच प्रकारच्या पिकाच्या उत्पादनावर काही देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे अवलंबून असते. त्यामुळे जागतिक तेजी-मंदीचा परिणाम त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो.
विस्तृत यांत्रिक धान्य शेती
ज्या वेळी विरळ लोकवस्तीच्या व मध्यम पाऊस पडणाऱ्या प्रदेशात, विस्तृत प्रमाणात उपलब्ध असलेल्या मध्यम प्रतीच्या शेतजमिनीतून मर्यादित मनुष्यबळाच्या साहाय्याने, भरपूर भांडवलाचा व आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून जास्तीत जास्त दरडोई उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न केला जातो त्या वेळी अशा शेतीला ‘विस्तारित किंवा विस्तृत शेती’ असे म्हणतात.
विस्तृत शेती दोन्ही गोलार्धात समशीतोष्ण कटिबंधात ३०० ते ५५० या अक्षवृत्तांच्या दरम्यान गवताळ प्रदेशात आढळते. या प्रदेशात अमेरिकेतील प्रेअरी, अर्जेंटिनामधील पम्पास, ब्राझीलमधील कंपोज, रशियाचा स्टेप्स, ऑस्ट्रेलियातील डाऊन्स व न्यूझीलंडमधील कँटेरबुरी मैदान यांचा समावेश होतो.
शेतांचा आकार फारच मोठा म्हणजे सामान्यतः ५०० ते १,००० हेक्टर्सपर्यंत असतो. या शेतीमध्ये गहू हे प्रमुख पीक आहे. उत्तरेकडील थंड हवामानाच्या प्रदेशात उन्हाळी गहू तर दक्षिणेकडील उबदार प्रदेशात हिवाळी गहू पिकवितात. प्रेअरी व स्टेप्सच्या विस्तीर्ण प्रदेशात गव्हाबरोबरच बार्ली, ओट, सोयाबीन, राय, मका इत्यादी पिकांची लागवड करतात. सुधारित बी-बियाणे व रासायनिक खतांचा भरपूर वापर या शेतीमध्ये करतात. कीटकनाशकांचाही वापर केला जातो. शेतीच्या सर्व प्रक्रिया व धान्य वाहतुकीची सर्व कामे यंत्राच्या साहाय्याने व शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जातात. मनुष्यबळाचा वापर फारच कमी प्रमाणात केला जातो. शेतीसाठी मोठ्या प्रमाणावरील भांडवलाची गरज भासते.
या शेतीप्रकारात दरहेक्टरी शेतीचे उत्पादन कमी असते, पण दरडोई उत्पादन अधिक असते. समशीतोष्ण कटिबंधात लोकसंख्या विरळ आहे. लोकसंख्येच्या तुलनेत गव्हाचे उत्पादन या शेतीत भरपूर होत असल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाची मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्यासाठीच ही शेती केली जाते.
संमिश्र शेती
मध्य कटिबंधात साधारण दाट लोकवस्तीच्या प्रदेशात शेतीतून एकाच वेळी किंवा चक्रीय पद्धतीने पिके, फळे व भाजीपाला यांचे पशुधनाचे सहकार्य घेऊन तसेच यांत्रिक अवजारे, खते, उत्तम प्रतीचे बी-बियाणे यांचा वापर करून अधिकाधिक व उत्तम दर्जाचे उत्पादन केले जाते त्यास संमिश्र शेती किंवा मिश्र शेती असे म्हणतात.
संमिश्र शेती वायव्य युरोप, उत्तर अमेरिकेचा पूर्व भाग, सैबेरिया, भूमध्य सामुद्रिक प्रदेश, ब्राझील, अर्जेंटिना व दक्षिण आफ्रिकेत केली जाते. मिश्र शेतीत जमिनींचा आकार सर्वसाधारण किंवा मध्यम स्वरूपाचा आढळतो. तो सामान्यापणे २० ते १०० हेक्टर्स दरम्यान असतो. संमिश्र शेतीत विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते व पशुपालनही केले जाते. या शेतीतून गहू, बालीं, मका, ओट यांसारख्या धान्यपिकांचे, विविध फळफळावळांचे, भाजीपाल्याचे, तसेच गवत, बटाटे, बीट, टर्निप यांसारख्या कंदमुळांचे उत्पादन घेतले जाते. पशुपालनातून दूध, मांस, कातडी, अंडी, लोकर हे पदार्थ मिळवितात. ही शेती अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते. या शेतीत मृदेचा सुपीकपणा टिकविण्यासाठी पिकांचा क्रम व पीकसंगती अनुसरली जाते. मृदेचा कस टिकविण्यासाठी जनावरांच्या मलमूत्राचा व इतर खतांचा वापर केला जातो. खतांचा दरहेक्टरी अधिकाधिक वापर करून, जलसिंचनाचा पर्याप्त वापर करून तसेच सुधारित बी-बियाणांचा व कीटकनाशकांचा वापर करून हेक्टरी उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न केले जातात. शेती उत्पादन साठविण्यासाठी आधुनिक कोठारांचा वापर करतात. गुरांसाठीही आधुनिक गोठें तयार केलेले असतात. संमिश्र शेतीतील उत्पादने स्थानिक तसेच परदेशी बाजारपेठेत पाठविली जातात. ही शेतीपद्धती बिनधोक शेतीपद्धती गणली जाते. अशा प्रकारच्या शेतीतून पशुपालनातून मिळणारी उत्पादने व पीक उत्पादने अशी दोन प्रकारची उत्पादने घेतली जात असल्याने बाजारभावात होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकऱ्यास फारशी झळ पोहोचत नाही; उलट, बाजारातील तेजी-मंदीचा फायदा शेतकरी घेऊ शकतात.