मुगल साम्राज्य | Mughal Empire information in Marathi
इ. स. १५२६ मध्ये भारतात मोगल घराण्याची स्थापना झाली. बाबर हा या घराण्याचा संस्थापक होय. तो अगोदर मध्य आशियातील काबूलच्या राज्याचा राजा होता. बाबरने काबूलहून भारतावर पाच स्वाऱ्या केल्या. त्याच्या शेवटच्या स्वारीत त्याने दिल्लीच्या लोदी घराण्याचा सुलतान इब्राहिम लोदी याचा पानिपतच्या पहिल्या लढाईत पराभव केला (इ. स. १५२६).पानिपतच्या विजयाने भारतात मोगल सत्तेचा पाया घातला गेला. दिल्लीवर मोगलांची सत्ता प्रस्थापित झाली. बाबर हा दिल्लीचा पहिला मोगल सम्म्राट बनला. बाबरनंतर हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब असे कर्तबगार सम्राट या घराण्यात होऊन गेले.
बाबर
(१) बाबरने (इ. स. १५२६-३०) दिल्लीची सत्ता काबीज केल्यावर हिंदुस्थानातील आपले आसन स्थिर व बळकट करण्याच्या कार्याकडे तो वळला. त्यासाठी त्याने प्रथम चितोडचा राजा राणासंग ऊर्फ संग्रामसिंग याच्याविरुद्ध मोहीम उघडली. इ. स. १५२७ मध्ये खानवा येथे बाबर व राणासंग यांच्या सैन्यांत घनघोर युद्ध होऊन त्यात बाबरचा जय झाला.
(२) त्यानंतर मुहंमद लोदी याच्याविरुद्ध घागराच्या (घागरा नदीच्या परिसरातील) लढाईतही बाबर विजयी ठरला. या विजया-मुळे उत्तर भारताचा फार मोठा प्रदेश त्याच्या नियंत्रणाखाली आला आणि त्याची सत्ता स्थिर झाली.
(३) बाबरच्या अंगी अनेक गुण होते. तो निष्णात सेनापती व शूर योद्धा होता. तसेच तो सुसंस्कृत व गुणग्राहक होता. त्याचे व्यक्तिगत जीवनही आदर्शवत् होते. या गुणांच्या जोरावरच तो भारतात मोगल साम्राज्याची स्थापना करू शकला.
हुमायून
(१) बाबरनंतर त्याचा मुलगा हुमायून (१५३०-४० व १५५५-५६) हा गादीवर आला. त्याला सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते; परंतु आपला जम बसविण्यात तो यशस्वी झाला. याच सुमारास त्याचा शेरखान या अफगाण सरदाराशी संघर्ष सुरू झाला. या संघर्षांची परिणती हुमायूनच्या पराभवात झाली.
(२) शेरखानाने प्रथम चौसा व नंतर बिलग्राम (इ. स. १५४०) येथील लढायांत हुमायूनचा पराभव केला. बिलग्रामच्या विजयानंतर शेरखानाने आग्रा व दिल्ली काबीज केली, हुमायूनला दिल्लीहून सिंधमध्ये पळ काढावा लागला.
शेरशहा
(१) शेरशहा (१५४०-४५) हा सूर वंशाचा होता. त्याचे अगोदरचे नाव शेरखान असे होते. पुढे चौसाच्या लढाईत (इ. स. १५३९) हुमायूनविरुद्ध विजय मिळविल्यानंतर त्याने शेरशहा हे नाव धारण करून सत्ता हाती घेतली आणि बंगाल व बिहारचा सुलतान बनल्याचे घोषित केले.
(२) इ. स. १५४० मध्ये त्याने आग्रा व दिल्लीवर ताबा मिळविला. त्यानंतर त्याने अनेक विजय मिळविले आणि उत्तर भारताचा फार मोठा प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणला.
(३) शेरशहा हा पराक्रमी योद्धा व कुशल सेनापती तर होताच; पण तो एक उत्कृष्ट प्रशार प्रशासकही होता. त्याने आपल्या राज्यात अनेक जमीनविषयक सुधारणा केल्या. महसूल पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. प्रजेच्या हिताविषयी तो दक्ष असे. एक न्यायी व उदार राजा म्हणूनही त्याची ख्याती होती. त्याने आपल्या कर्तबगारीने दिल्लीची मोगलांची सत्ता नष्ट करून तेथे अफगाण सत्ता प्रस्थापित केली. इ. स. १५४५ मध्ये त्याचा मृत्यू झाला.
पुन्हा हुमायून
शेरशहाच्या मृत्यूनंतर त्याच्या सूर वंशाच्या सत्तेला उत्तरती कळा लागली. हुमायून दिल्लीहून पळाला होता; पण दरम्यानच्या काळात त्याने अफगाणिस्तानात आपले राज्य स्थापन केले होते. योग्य संधी मिळताच तो भारतात परत आला. सरहिंदच्या लढाईत (१५५५) हुमायूनने सिकंदर सूरचा पराभव केला आणि दिल्लीची सत्ता पुन्हा काबीज केली; पण नंतर लवकरच तो मृत्यू पावला (१५५६).
अकबर
हुमायूननंतर त्याचा मुलगा अकबर (१५५६-१६०५) हा गादीवर आला. अकबराचा जन्म १५४२ मध्ये झाला. तो गादीवर आला तेव्हा त्याचे वय फक्त चौदा वर्षे इतके होते. अकबरालादेखील त्याच्या वडिलांप्रमाणेच सुरुवातीच्या काळात अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. हुमायूनने दुसऱ्यांदा दिल्लीचे राज्य मिळविले असले तरी ते स्थिर झाले नव्हते. हुमायूनच्या मृत्यूचा फायदा घेऊन अफगाण सरदार मुहंमद आदिलशहा याचा प्रधानमंत्री हेमू याने आग्रा व दिल्ली काबीज केली. त्यानंतर तो अकबराविरुद्ध लढण्यासाठी निघाला.
पानिपतची दुसरी लढाई
(१) या वेळी अकबराचा पालक असलेल्या बैरामखानाने हेमूला तोंड देण्याची सिद्धता केली. दोन्हीं सेना पानिपत येथे समोरासमोर आल्या. हीच पानिपत्तची दुसरी लढाई (१५५६) होय. या युद्धात अकबराचा विजय झाला. त्याने लगेच दिल्लीत प्रवेश केला व तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली.
(२) या पुढील काळात अकबराने आपल्या अनेक संभाव्य शत्रूचा पराभव केला, त्याने ग्वाल्हेर, जोनपूर, माळवा, गोंडवन, रणथंबोर, कलिंजर, जोधपूर, बिकानेर, गुजरात, बिहार, बंगाल, काबूल, काश्मीर इत्यादी सर्व प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणले.
(३) मेवाडचा राजा उदयसिंह व त्याचा मुलेगा राणाप्रताप यांनी अकबराविरुद्ध प्राणपणाने झुंज दिली. मोगल फौजेने हळदीघाटाच्या लढाईत (१५७६) राणाप्रतापचा मोठा पराभव केला. तरीही राणाप्रतापने मोगलांपुढे अखेरपर्यंत शरणागती पत्करली नाही.
(४) अकबराचे साम्राज्य बंगालपासून काबूल-कंदाहार-पर्यंत आणि हिमालयापासून गोदावरी नदीपर्यंत पसरले होते. इ. स. १६०५ मध्ये त्याच्या साम्राज्यात एकूण १५ सुभे किंवा प्रांत होते.
(५) अकबराने धार्मिक बाबतीत सहिष्णू धोरण स्वीकारले होते. त्याने हिंदूंना सन्मानाने वागविले. रजपुतांशी मैत्रीचे संबंध जोडले व त्यांना आपल्या बाजूला वळवून घेतले. इतकेच नव्हेतर त्याने निरनिराळ्या धर्मातील आदर्श तत्त्वे एकत्र करून ‘दीन-ए-इलाही’ हा नवा धर्म स्थापन केला.
(६) अकबर हा भारतात होऊन गेलेला एक थोर राज्यकर्ता होता. आपल्या राज्यातील सर्व प्रजेला त्याने समानतेची वागणूक दिली. तो प्रजाहितदक्ष, न्यायी, दयाळू व उदार अंतःकरणाचा सम्राट होता. तो महान सेनापती व कुशल प्रशासक म्हणूनही प्रसिद्ध होता. तो विद्या व कला यांचा आश्रयदाता व विद्वानांचा चाहता होता. त्याच्या दरबारात अनेक थोर विद्वान, पंडित व कलावंत होते. त्याने ज्या जमीनविषयक सुधारणा केल्या त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला होता. इतर प्रजाजनांचीही त्याने अशीच काळजी घेतली होती.
जहांगीर
अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर (१६०५-२७) हा मोगल साम्राज्याचा सम्राट बनला. त्याच्या जीवनातील काही ठळक घटना-
(१) जहांगीरचा मुलगा खुस्रो याने बापाविरुद्ध उठाव केला (१६०६); पण तो मोडून काढला गेला.
(२) शिखांचे पाचवे गुरू अर्जुनसिंग यांना त्याने ठार केले. त्यामुळे शीख मोगलांविरुद्ध गेले.
(३) इ. स. १६११ मध्ये नुरजहानशी विवाह.
(४) मेवाडचा राजा अमरसिंग याने मोगलांची सत्ता मान्य केली.
(५) अहमदनगरच्या निजामशाहीविरुद्ध मोहिमा.
(६) कंदाहार गमावले (१६२२).
जहांगीरवर नुरजहानचा अतिशय प्रभाव होता. त्यामुळे तिचा राज्यकारभारातील हस्तक्षेप वाढला. परिणामी जहांगीरचा मुलगा शहाजहान याने बापाविरुद्ध उठाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. जहांगीर हा कलाप्रेमी बादशहा होता. तसेच तो विद्वान व कलाकार यांचा आश्रयदाता होता. जहांगीरच्या कारकिर्दीत चित्रकलेचाही भरीव विकास झाला. त्रिमिती धर्तीची चित्रकला खऱ्या अर्थान त्याच्याच कारकिर्दीत विकास पावली. तो स्वतः विद्वान व न्यायी राज्यकर्ता होता,
शहाजहान
(१) जहांगीरच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला. या संघर्षात शहाजहानने (१६२७-५८) आपल्या विरोधकांवर मात करून गादी बळकाविली. इ. स. १६२८ मध्ये येथे तो राज्यारूढ झाला. शहाजहानचे अगोदरचे नाव खुर्रम असे होते. बापाच्या कारकीर्दीत त्याने रणांगणावर अनेक पराक्रम गाजविले होते.
(२) सत्तेवर आल्यावर शहाजहानला बुंदेले व खानजहान लोदी यांच्या बंडांना सामोरे जावे लागले; पण शहाजहानने ते उठाव मोडून काढले. त्याने हुगळी येथील पोर्तुगीजांनाही वठणीवर आणले. त्याच्या कारकिर्दीत मोगलांनी दक्षिणेत मोठे विजय मिळविले.
(३) इ. स. १६३६ मध्ये मोगल सेनेने निजामशाही बुडविली. आदिलशाही व कुतुबशाही यांच्याविरुद्धही मोगलांनी मोठे विजय मिळविले. मध्य आशियाच्या मोहिमेत मात्र
शहाजहानला अपयश पत्करावे लागले.
(४) शहाजहानच्या हयातीतच त्याचा मुलगा औरंगजेब याने त्याला तुरुंगात टाकून गादी बळकाविली (१६५८). पुढे इ. स. १६६६ मध्ये शहाजहानचा मृत्यू झाला.
शहाजहानच्या कारकिर्दीला ‘मोगल साम्राज्याचे सुवर्णयुग’ असे म्हणतात, त्याची कारणे (१) राजकीय स्थैर्य, राज्यात शांतता व सुव्यवस्था. (२) चांगली आर्थिक स्थिती. (३) कला व वाङ्मय यांत प्रगती या काळात अनेक इमारती बांधल्या गेल्या. उदाहरणार्थ ताजमहाल, आग्ऱ्याची मोती मशीद, दिवाण-ई-आम व दिवाण ई-खास ही सभागृहे, दिल्लीची
जामा मशीद, रंगमहाल इत्यादी. शहाजहानचे रत्नजडित मयूर सिंहासन तर इतिहासप्रसिद्धच ठरले आहे. अजमेर येथील जामा मशीद बांधण्याचे श्रेयही शहाजहानलाच द्यावे लागते. चित्रकला व संगीत या कलांनाही त्याने उत्तेजन दिले. त्याच्या पदरी अनेक चांगले कलाकार होते. तो विद्याप्रेमी होता. त्याने अनेक विद्वानांनाही आश्रय दिला होता. त्याच्या काळात अनेक लेखक व इतिहासकार होऊन गेले. (४) लोकहिताची कामे. (५) सांस्कृतिक प्रगती इत्यादी.
औरंगजेब
(१) औरंगजेबाने (१६५८-१७०७) बापाला कैदेत टाकून व भावांना ठार मारून दिल्लीची सत्ता हस्तगत केली. शहाजहानने त्याला दक्षिणेचा सुभेदार नेमले होते. त्या वेळीच त्याने आपल्या कर्तबगारीची चुणूक दाखविली होती. दिल्लीची सत्ता हाती आल्यावर त्याने अत्यंत निर्दयपणे आपल्या सर्व विरोधकांना मार्गातून हटवून आपला मार्ग निष्कंटक केला.
(२) औरंगजेब अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. तसेच तो शूर व पराक्रमीही होता. सर्व हिंदुस्थानवर आपली सत्ता प्रस्थापित करण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याने साम्राज्य-विस्ताराच्या उद्देशाने वायव्य सरहद्द प्रांतावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्याला काहीसे यश आले; पण त्याची बरीच हानीही झाली. रजपूतांविरुद्धही त्याने संघर्ष सुरू केला.
(३) दक्षिण भारत जिंकण्यासाठी तो शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दक्षिणेत उतरला. प्रारंभी त्याला थोडेफार यश मिळाले. त्याने विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही या मुसलमानी सत्ता नष्ट केल्या. फंदफितुरीचा आसरा घेऊन त्याने मराठा सत्ताधीश छत्रपती संभाजीराजे यांना पकडून त्यांची हत्या केली; परंतु मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाला त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.
(४) छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूने चवताळलेल्या मराठ्यांनी मोगलांना गनिमी काव्याचा हिसका दाखविला व त्यांना सळो की पळो करून सोडले. औरंगजेबाची सारी प्रतिष्ठाच मराठ्यांनी धुळीस मिळविली. सर्व हिंदुस्थान जिंकण्याचे त्याचे स्वप्न धुळीस मिळाले. उलट, त्याच्या दक्षिणेतील दीर्घ वास्तव्या-मुळे उत्तर भारतात अराजक माजले. जाट, शीख व रजपूत यांनी मोगलांविरुद्ध बंड पुकारले. राज्याची आर्थिक स्थिती खालावली. राजकीय स्थैर्य नष्ट झाले. अशा प्रकारे औरंगजेबाच्या काळातच मोगल साम्राज्याच्या पतनाचा पाया घातला गेला,
(५) औरंगजेबाचे धार्मिक धोरण अत्यंत असहिष्णू होते. तो स्वतःला कडवा मुसलमान समजत असे. त्यामुळे त्याच्या राज्यात हिंदूंचा अनन्वित छळ झाला. हिंदूंवर जिझिया कर लादला गेला. सक्तीचे धर्मांतर, हिंदूंच्या मंदिरांची पाडापाड यांसारखे प्रकार वाढले. त्यामुळे बहुसंख्य हिंदू प्रजेत असंतोष पसरला.
(६) औरंगजेब एक कर्तबगार राज्यकर्ता होता. तो पराक्रमी योद्धा व उत्तम सेनापती होता. त्याची राहणी अगदी साधी होती; पण त्याच्यातील दोषांनी त्याच्या या गुणांची माती केली. तो संशयी, कपटी, विश्वासघातकी, धर्मांध, हिंदुद्वेष्टा व कमालीचा अहंकारी होता. त्यामुळेच आपले साम्राज्य आपल्या डोळ्यांदेखत बुडत असल्याचे पाहण्याचा प्रसंग त्याच्यावर ओढवला.