परिसंस्थेची कार्ये संपूर्ण माहिती | Ecosystem Meaning in Marathi

परिसंस्थेची कार्ये संपूर्ण माहिती | Ecosystem Meaning in Marathi

प्रकाशसंश्लेषण

वनस्पती प्रकाशसंश्लेषणाद्वारे आपले अन्न तयार करतात. वनस्पतीची पाने श्वासोच्छ्‌वासाचे कार्य करतात. मुळे अन्नरस शोषतात त्यांत असेंद्रिय घटक असतात. वनस्पती पानांतून कार्बन-डाय-ऑक्साइड वायू गोळा करतात, तर मुळांतून असेंद्रिय घटक गोळा करतात. यावर सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने जी क्रिया होते ती प्रकाशसंश्लेषक क्रिया होय. यामुळे वनस्पतीत अन्न तयार होते. यामुळे वनस्पतीस ‘अन्न उत्पादक’ असे म्हणतात.

हा अन्नाचा पुरवठा वनस्पतींतून अन्य सजीव घटकांना होतो. हे सजीव घटक वनस्पतीकडून अन्न घेऊन ते उपभोगत असल्याने त्यांना ‘उपभोगक’ किंवा ‘भक्षक’ असे संबोधतात.

ऊर्जाविनिमय

सजीव घटकाने भक्षण केलेल्या अन्नापासून ऊर्जेची निर्मिती होते. ही ऊर्जानिर्मिती परिसंस्थेत दर्जानुसार चढत्या क्रमाने दाखवितात.
ही ऊर्जा एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे जाते. तो ऊर्जेचा विनिमय होय. हा विनिमय विविध अशा चार थरांवर मोजतात.
हा ऊर्जाविनिमय म्हणजेच एका परिसंस्थेतील अन्न एका गटाकडून दुसऱ्या एका वेगळ्या गटाकडे जाणे म्हणजे ‘अन्नाचे संक्रमण’ होय.

अन्नसंक्रमणास ‘अन्नसाखळी’ असे म्हणतात. ही ‘साखळी’ लिंडमन नामक शास्त्रज्ञाने विविध पातळ्यांवर दाखविली. त्यास ‘ऊर्जाविनिमयस्तर’ म्हणतात. ऊर्जाविनिमय-स्तराची अधिक माहिती पुढीलप्रमाणे-

(१) हिरव्या वनस्पतींवर दिवसा सूर्यप्रकाशामुळे जे प्रकाशसंश्लेषण होते व त्या स्वतःचे अन्न तयार करतात त्यास ‘प्रथम ऊर्जाविनिमयस्तर’ म्हणतात.

(२) स्वतःस लागणारे अन्न स्वतःच उत्पादन करू न शकणारे व त्याकरिता प्रथम ऊर्जानिर्मितीस्तरावर अवलंबून असलेल्या सजीव प्राण्यांचा स्तर म्हणजे ‘द्वितीय विनिमयस्तर’ होय. या स्तरात मानवासह वनस्पतींचा पाला खाणाऱ्या प्राण्यांचा समावेश होतो. त्यांना तृणभक्षक तसेच ‘प्रथम भक्षक’ असे म्हणतात.

(३) स्वतःच्या अन्नासाठी तृणभक्षक प्राण्यांवर अवलंबून असणारे प्राणी तृतीय ऊर्जाविनिमय स्तरात येतात. त्यांना ‘मांसभक्षक प्राणी’ म्हणतात. ते ‘दुय्यम भक्षक’ म्हणून ओळखले जातात. हे सर्व तृतीय ऊर्जाविनिमयस्तरात समाविष्ट होतात. त्यांत वाघ, सिंह, चित्ता, गिधाड, गरुड इत्यादींचा समावेश होतो.

(४) प्रथम, द्वितीय, तृतीय या खालच्या ऊर्जाविनिमय-स्तरांतून अन्न मिळविणारे घटक हे चतुर्थ विनिमय स्तरात येतात. मानव हा चौथ्या स्तरातील घटक होय. या स्तरातील प्राण्यांना ‘बहुभक्षी’ असे म्हणतात. विघटक वर्गात मोडणाऱ्या बुरशी, जिवाणूंचा या स्तरात समावेश होतो.

विघटन

(१) जिवाणू, बुरशी, कवके यांसारखे सूक्ष्मजीव परिसंस्था रचनेत विघटनाचे कार्य करतात. सर्व-साधारणपणे सूक्ष्मजीव हरित-द्रव्यविरहित असल्याने ते स्वतःचे अन्न तयार करू शकत नाहीत. यामुळे त्यांचा उल्लेख ‘परपोषी’ या गटात होतो.

(२) हे सूक्ष्मजीव कुजणाऱ्या वनस्पती आणि मृत प्राण्यांच्या शेष भागांत साठलेल्या सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात. म्हणून त्यांना ‘विघटक’ म्हणतात.

(३) बहुसंख्य जिवाणू माती-तील कार्बनयुक्त पदार्थांपासून अन्न मिळवितात. प्रथिने, शर्करा व मेद

या कार्बनयुक्त सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन असेंद्रिय पदार्थ पुन्हा पर्यावरणात मुक्त केले जातात. यामुळे परिसंस्था रचना कार्यान्वित होताना विघटनाचे महत्त्व अनन्यसाधारण असते.

अन्नसाखळी

(१) प्रत्येक परिसंस्थेत वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीवांचे जैविक समाज एकत्र असतात. विविध जैविक समाजांचे उत्पादक, भक्षक व विघटक असे तीन वर्ग असतात. उत्पादक जीवसमाज प्रकाशसंश्लेषणाद्वारे सौरप्रकाश ऊर्जेचे रूपांतर कार्बन-डाय-ऑक्साइड, पाणी, हरितद्रव्ये यांचा उपयोग करून त्याचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात.

(२) वनस्पती शर्करेच्या स्वरूपात स्वयंनिर्मित अन्नाची साठवण करतात. स्वयंनिर्मित अन्न तयार करण्याची क्षमता फक्त वनस्पतींमध्ये असते. यामुळे त्यांना ‘उत्पादक’ म्हणतात.

(३) सर्व प्राणी अन्नासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरूपात वनस्पतींवर अवलंबून असतात.

(४) तृणभक्षक प्राणी वनस्पती भक्षण करून ऊर्जा मिळवितात. हे तृणभक्षक प्राणी मांसभक्षक प्राण्यांचे अन्न असते. तृणभक्षक प्राण्यांकडून मांसभक्षक प्राण्यांकडे ऊर्जेचे संक्रमण होते.

(५) लहान मांसभक्षक प्राणी, मोठ्या मांसभक्षक प्राण्यांचे अन्न असते. लहान मांसभक्षक प्राण्यांकडून ही ऊर्जा मोठ्या मांसभक्षक प्राण्यांकडे संक्रमित होते.

(६) अन्नऊर्जेच्या वनस्पतींपासूनच्या संक्रमणापासून ते थेट भिन्नभिन्न प्रकारच्या प्राण्यांच्या भक्ष्यांच्या क्रमवार संक्रमणास ‘अन्नसाखळी’ असे म्हणतात. अशा प्रकारे अन्नऊर्जा निम्नस्तरीय जिवांकडून उच्चस्तरीय जिवांकडे संक्रमित होते. या लिंडमनच्या ऊर्जेच्या संक्रमणाच्या विविध पातळ्या यापूर्वी आपण पाहिल्या आहेत.

(७) अन्नसाखळीत प्रत्येक संक्रमणाच्या वेळी काही ऊर्जा वापरली गेल्याने ती क्षय पावते. यामुळे परिसंस्था कार्यान्वित व कायम राहण्यासाठी बाह्य ऊर्जेचा वापर करावा लागतो.

(८) प्रत्येक अन्नसाखळीचे भक्ष्य आणि भक्षक असे दोन प्रकार असतात. यामुळे अन्नसाखळीचे एक, तृणभक्षक अन्नसाखळी आणि दोन, मृत वनस्पती व प्राणिजन्य अवशेष साखळी असे दोन प्रकार होतात.

(९) तृणभक्षक अन्नसाखळी हिरव्या वनस्पतींपासून सुरू होते आणि तृणभक्षक व मांसभक्षक प्राण्यानंतर ती संपते. प्रथम उत्पादक, तृणभक्षक व नंतर मांसभक्षक अशी अन्नसाखळी निसर्गात सहसा आढळत नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे भक्षक आपले अन्न विविध मार्गानी मिळवू शकतो. तो एकाच परिसंस्थेतून एकापेक्षा अधिक ऊर्जाविनिमयस्तरांवर कार्यक्षम असू शकतो.

(१०) एक जीव असंख्य भक्षकांचे लक्ष्य असू शकतो. यामुळे अन्नसाखळ्या निगडित व आंतरछेदी स्वरूपाच्या असतात. यामुळे अन्नजाळ्याची निर्मिती होते.

(११) ग्रहण केलेली ऊर्जा विविध क्रियांकरिता खर्ची पडते. तिचे उत्सर्जन होते. काही परावर्तित होते, तर काही शोषली जाते. यामुळे कोणत्याही अन्नजाळीत उपलब्ध असलेल्या अन्नऊर्जेवर परिसंस्थेतील सजीव पूर्णतः अवलंबून राहू शकत नाहीत, अन्नसाखळीत वनस्पतींसारख्या प्राथमिक उत्पाद‌कांकडून मोठ्या प्राण्यांसारख्या उच्चस्तरीय भक्षकाकडे ऊर्जेचे प्रमाण कमी होत जात असते.

(१२) प्राण्यांना वनस्पतींपेक्षा कमी अन्नऊर्जा मिळते तर अन्ननिर्मिती स्थानाजवळ असणाऱ्या तृणभक्षक व मांसभक्षक सजीवांना अधिक अन्नऊर्जा मिळते.

(१३) अन्नसाखळीत वरच्या विनिमयस्तरावर ऊर्जेचे संक्रमण होताना ऊर्जा क्षय पावते. याचा अर्थ तृणभक्षकाचे जैविक वस्तुमान वनस्पतीपेक्षा कमी असते. याप्रमाणे क्रमशः उच्चस्तरीय प्राण्यांत हे जैविक वस्तुमान सर्वांत कमी असते.

(१४) थोडक्यात, परिसंस्थेत जैविक समूह व जैविक वस्तुमान हिरव्या वनस्पतींच्या उपलब्धतेवर व उत्पादनक्षमतेवर अवलंबून असते. उष्ण कटिबंधीय प्रदेशातील जैविक समूह व जैविक वस्तुमान सर्वांत अधिक असून ते ध्रुवीय प्रदेशाकडे कमी कमी होत गेले आहे. ध्रुवीय प्रदेशांत ते सर्वांत कमी आहे. संपूर्ण जैविक समाजाची निर्मिती व त्याचा विस्तार अन्नसाखळीवर आधारित असतो.

पारिस्थितिकी मनोरा/पिरॅमिड

(१) ही संकल्पना प्रथमतः ब्रिटिश पारिस्थितिकी शास्त्रज्ञ चार्लस् एल्टन याने मांडली. परिसंस्थेच्या ऊर्जाविनिमय अभ्यासांत त्यास असे आढळले की, कोल्हे ज्या पक्ष्यांवर जगतात त्या पक्ष्यांची संख्या कोल्ह्यांच्या संख्येपेक्षा कितीतरी अधिक असते. चिमण्यांसारखे अनेक पक्षी ज्या कीटकांवर जगतात, त्यांची संख्या चिमण्यांसारख्या पक्ष्यांपेक्षा अनेक पटींनी अधिक असते.

(२) यावरून त्याने एक, ऊर्जाविनिमयस्तराच्या प्राथमिक पातळीपासून जसजसे उच्च विनिमयस्तराकडे जावे तसतसे जीवप्रकार कमी कमी होत जातात. दोन, वनस्पतींच्या निम्न-स्तराकडून उच्चस्तराकडे जैविक वस्तुमान कमी होत जाते. तीन, निम्न ऊर्जाविनिमयस्तराकडून पुढच्या प्रत्येक ऊर्जा विनिमय-स्तराकडे ऊर्जा कमी होत जाते, अशा प्रकारचे अनुमान काढले आहे.

(३) थोडक्यात, पुढच्या प्रत्येक विनिमयस्तरावर जीव-प्रकार, जैविक वस्तुमान आणि ऊर्जाक्षमता कमी होत जाते. यामुळे पुढच्या प्रत्येक ऊर्जाविनिमयस्तरावर अन्नसाखळीचा आकार एखाद्या मनोऱ्यासारखा वरच्या बाजूस निमुळता होत जातो. यालाच ‘पारिस्थितिकी मनोरा’ असे म्हणतात.

Also Read

ऊर्जासाधनांचे जागतिक वितरण

Leave a Comment