मराठा साम्राज्याचा इतिहास | History of maratha empire in marathi
भारताच्या इतिहासातील सतराव्या शतकातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना म्हणून ‘मराठी सत्तेचा उदय’ या घटनेचा निर्देश करता येईल. या घटनेने महाराष्ट्राच्याच नव्हेतर संपूर्ण भारताच्या इतिहासावर दूरगामी परिणाम घडवून आणले. यापुढील काळात हिंदुस्थानातील एक प्रभावी राजकीय सत्ता म्हणून मराठी सत्तेकडे पाहिले जाऊ लागले. सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी सत्तेच्या स्थापनेने हिंदूंच्या विशेषतः मराठ्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. त्यांच्यातील स्वाभिमान व क्षात्रतेज जागृत केले आणि त्यांना एका आगळ्यावेगळ्या राजकीय शक्तीचे स्वरूप प्राप्त करून दिले.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
महाराष्ट्रात मराठी सत्तेची स्थापना करण्याचे ऐतिहासिक कार्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. त्यांचा जन्म इ. स. १६३० मध्ये शिवनेरी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले, तर आईचे नाव राजमाता जिजाबाई असे होते. शहाजीराजे भोसले हे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते. निजामशाहीच्या पडत्या काळात त्यांनी निजामशाहीला वाचविण्याचा निकराचा प्रयत्न केला होता. पुढे निजामशाहीच्या पतनानंतर ते आदिलशाहीच्या सेवेत गेले. तेथेही त्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला.
शिवरायांवर चांगले संस्कार करण्याचे व त्यांना स्वधर्माविषयी अभिमानी बनविण्याचे कार्य त्यांची आई राजमाता जिजाबाई यांनी केले. शहाजीराजे विजापूरच्या दरबारात असताना राजमाता जिजाबाई बाल शिवबांसमवेत पुण्याच्या जहागिरीची व्यवस्था पाहत होत्या. त्यामुळे शिवाजी महाराजांना घडविण्याची जबाबदारी जिजाबाईंनीच पार पाडली. शिवाजी महाराजांनी मावळ्यांची तरुण मुले गोळा केली आणि त्यांच्यातील स्वाभिमान व स्वातंत्र्यप्रेम जागृत केले. या साथीदारांच्या जोरावरच महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. लवकरच त्यांनी मावळखोऱ्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही ठळक घटना पुढीलप्रमाणे-
(१) १६५६ : चंद्रराव मोऱ्यांचा पाडाव. जावळी स्वराज्यात सामील.
(२) १६५९ : विजापूरचा सरदार अफझलखान याची स्वराज्यावर स्वारी. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल-खानाच्या सैन्याचा पराभव, भेटीदरम्यान दगाबाज अफजल-खानाचा वाघनख्यांच्या साहाय्याने कोथळा बाहेर काढला. याचवर्षी शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकला.
(३) १६६० : शिवाजीराजे पन्हाळा मुक्कामी असताना विजापुरी सैन्याचा पन्हाळ्यास वेढा. शिवाजी महाराजांनी हिकमतीने पन्हाळ्यावरून सुटका करून घेतली. याचप्रसंगी पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांचे धन्याला वाचविण्या-साठी आत्मबलिदान, याच वर्षी शाहिस्तेखानाचे दक्षिणेत आगमन.
(४) १६६३ : पुणे स्थित लाल महालात रात्रीच्या वेळेस घुसून शाहिस्तेखानावर धाडसी हल्ला केला. परिणामी, मोगल फौजेत घबराट.
(५) १६६४ : सुरतेची पहिली लूट. याच वर्षी सिंधुदुर्ग या जलदुर्गाची उभारणी.
(६) १६६५ : मिर्झाराजा जयसिंगची स्वराज्याविरुद्ध मोहीम. मोगलांचा पुरंदरास वेढा. मुरारबाजीचे शौर्य व बलिदान. पुरंदरचा तह.
(७) १६६६ : शिवाजी महाराज व मोगल बादशहा औरंगजेब यांची आग्रा येथे भेट. शिवाजी महाराज औरंगजेबा-च्या कैदेत. शिवारायांनी चलाखीने कैदेतून सुटका करून
घेतली व त्यांचे स्वराज्यात पुनरागमन.
(८) १६७० : सुरतेची दुसरी लूट. कोंढाणा (नंतरचे नाव सिंहगड) काबीज पण तानाजीचा मृत्यू, मराठ्यांनी आणखीही काही किल्ले काबीज केले.
(९) १६७४: ६ जून, रोजी शिवरायांना राज्याभिषेक करण्यात आला. मराठ्यांच्या सार्वभौम राज्याच्या स्थापनेची ग्वाही. १७ जून, रोजी राजमाता जिजाऊंचा मृत्यू.
(१०) १६७७-७८ : शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहीम. भरीव यशप्राप्ती.
(११) १६८० : रायगडावर महानिर्वाण.
शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य हे खऱ्या अथनि राष्ट्रउभारणीचे कार्य होते. जुलमी, अन्यायी व धर्माध सत्तेच्या विरोधात येथील जनशक्तीला संघटित करून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचे असामान्य कर्तृत्व त्यांनी दाखविले, छत्रपती शिवाजी महाराज एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते, उत्कृष्ट प्रशासक, परधर्मसहिष्णू शासक, अजोड संघटक आणि दूरदृष्टीचे राष्ट्रवादी नेते म्हणूनही सर्वमान्य आहेत. महाराज खऱ्या अथनि शककर्ते होते.
हिंदुस्थानच्या इतिहासात इतक्या असामान्य कर्तृत्वाचा प्रतिभाशाली व गुणसंपन्न राज्यकर्ता दुसरा कोणी क्वचितच आढळतो.
छत्रपती संभाजी महाराज
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज (१६८०-८९) मराठ्यांच्या गादीवर आले; पण त्यासाठी त्यांना अष्टप्रधानमंडळातील काही जुन्या मंडळींशी संघर्ष करावा लागला. छत्रपती संभाजी महाराज आपल्या वडिलांप्रमाणेच शूर, पराक्रमी व कर्तृत्ववान होते. शिवरायांच्या मृत्यूनंतर मोगल बादशहा औरंगजेब हा दख्खन काबीज करण्याच्या ईर्षने दख्खनमध्ये उतरला (इ. स. १६८१). त्याचे सामर्थ्य इतके अफाट होते की, त्यापुढे आदिलशाही व कुतुबशाही या सत्ताही काही महिन्यांहून अधिक काळ तग धरू शकल्या नाहीत; पण अशा औरंगजेबाला संभाजी महाराजांनी नऊ वर्षांपर्यंत झुंजत ठेवले. काही प्रसंगी तर मराठ्यांनी मोगल सैन्याला माघार घेण्यासही भाग पाडले. यावरून संभाजी महाराजांचे कर्तृत्व स्पष्ट होते.
तथापि, संभाजी महाराजांना स्वकीयांपैकी काहींनी विरोध केला. आपल्या वाटेवरील काटे दूर करण्यासाठी संभाजी महाराजांना संघर्ष करावा लागला. ‘बुधभूषण’ या संस्कृत काव्याचा कर्ता असलेल्या या महापराक्रमी महापंडिताच्या गुणांचे दुर्दैवाने म्हणावे तसे चीज होऊ शकले नाही. १ फेब्रुवारी, १६८९ रोजी शेख निजाम या मोगल सरदाराने संभाजी महाराजांच्या संगमेश्वर येथे असलेल्या गोटावर अचानक हल्ला करून त्यांना पकडले. औरंगजेबाने त्यांना हालहाल करून ठार मारले; पण या कसोटीच्या क्षणी त्यांनी दाखविलेला स्वाभिमान, धर्मनिष्ठा व बाणेदार वृत्ती यांमुळे सर्व मराठ्यांर्ची छाती गर्वाने फुलून आली. एक गौरवशाली हौतात्म्य संभाजी महाराजांच्या वाट्यास आले, त्यांच्या बलिदानातून मराठ्यांना स्वराज्यरक्षणाची प्रेरणा मिळाली.
मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध
संभाजी महाराजांच्या बलिदानाने मराठे औरंगजेबा-विरुद्ध पेटून उठले. आपल्या छत्रपतीच्या मृत्यूचा सूड उगविण्याचा त्यांनी निर्धार केला आणि वेथूनच मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध (१६८९ ते १७०७) सुरू झाले. कोणत्याही परिस्थितीत आपले स्वातंत्र्य मोगलांकडे गहाण पडू द्यावयाचे नाही, अशी जिद्द मराठ्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा राज्य आता आपल्या हातातच आहे, असा औरंगजेबाचा समज झाला; पण तो त्याचा भ्रम ठरला. मोगलांनी फितुरीने रायगड ताब्यात घेतला. संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई व मुलगा शाहू राजे मोगलांच्या कैदेत सापडले; पण संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज तेथून निसटले. त्यांना मराठ्यांनी छत्रपती म्हणून घोषित केले (इ. स. १६८९). पुढे राजाराम महाराज जिंजीला गेले.
इकडे मराठ्यांनी गनिमी काव्याचा अवलंब करून मोगलांना जेरीस आणले. या संघर्षात संताजी घोरपडे, धनाजी जाधव आदींनी अतुलनीय शौर्य गाजविले. संताजी व धनाजी यांनी मोगलांच्या अनेक मातब्बर सेनापतींना रणांगणावर धूळ चारली. संताजीने तर खुद्द औरंगजेबाच्या छावणीवरच हल्ला चढविण्यापर्यंत मजल मारली. मराठ्यांच्या भडिमाराने औरंगजेब पुरता खचून गेला. त्याच्या सैन्याचे नीतिधैर्यच संपुष्टात आले. महाराष्ट्रातील परिस्थिती मराठ्यांना अनुकूल बनल्यावर राजाराम महाराज जिजीहून परत आले (१६९८), त्यांनी मोगलांच्या प्रदेशात मोहीम उघडली; पण इ. स. १७०० मध्ये त्याचा सिंहगडावर मृत्यू झाला.
राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यांनी आपला मुलगा शिवाजी यास गादीवर बसविले आणि मोगलांविरुद्धचा लढा चालूच ठेवला. या काळात मोगलांनी मराठ्यांचा एकेक किल्ला काबीज करावा व मराठ्यांनी तो लगेच परत मिळवावा, असे प्रकार सुरू झाले. मराठ्यांविरुद्ध चालविलेल्या लढ्यातील फोलपणा आता औरंगजेबालाही कळून चुकला. या संघर्षात आपला विजय तर होत नाहीच; पण आपली सर्व प्रतिष्ठाही आपण गमावली आहे याची त्यास खात्री पटली. अशा निराशाजनक अवस्थेतच १७०७मध्ये अहमदनगर मुक्कामी औरंगजेब मृत्यू पावला. यावरून आपल्याला असे दिसून येते की, मराठे बलाढ्य अशा औरंगजेबाच्या सत्तेला पुरून उरले.
शाहूराजांची सुटका व सत्तासंघर्ष
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांचे पुत्र – शाहूराजे यांची मोगलांच्या कैदेतून सुटका झाली (इ. स. १७०७). शाहूराजे स्वराज्यात परत आले आणि त्यांनी गादीवर आपला हक्क सांगितला. महाराणी ताराबाईंनी शाहूराजांचा गादीवरील हक्क अमान्य केला. त्यामुळे गृहकलहास प्रारंभ झाला; पण धनाजी जाधवासह महाराणी ताराबाईंचे अनेक मातब्बर सरदार शाहूराजांशी येऊन मिळाल्याने शाहूराजांचा पक्ष बळकट झाला. खेडच्या लढाईत शाहूराजांनी महाराणी ताराबाईंच्या सैन्याला पराभूत केले (इ. स. १७०७). इ. स. १७०८ मध्ये शाहूराजे साताऱ्यास आले आणि – त्यांनी स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला. तिकडे महाराणी ताराबाईंनी कोल्हापूरला स्वतंत्र गादी निर्माण करून त्यावर आपला मुलगा शिवाजी यांस बसविले.
एवम, मराठ्यांच्या दोन गाद्या अस्तित्वात आल्या. तथापि, बहुसंख्य मराठा सरदार शाहूराजांच्या पक्षात असल्याने त्याची सत्ता अधिक प्रबळ झाली व साताऱ्याची गादीच छत्रपतींची खरी गादी मानली जाऊ लागली.
पेशवाईचा उदय
छत्रपती शाहूराने दीर्घकाळ मोगलांच्या कैदेत राहिले असल्याने त्यांना युद्धाचा अगर राज्यकारभाराचा फारसा अनुभव नव्हता. तथापि, त्यांना माणसांची पारख फार चांगली होती. इ. स. १७१३ मध्ये त्यामुळे त्यांनी बाळाजी विश्वनाथ यांस पेशवा नेमले व राज्याची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. त्यामुळे पेशवे प्रबळ झाले व छत्रपती नामधारी राहिले.
शाहूराजांच्या मृत्यूनंतर (इ. स. १७४९) तर सर्व सत्ता पेशव्यांच्याच हाती गेली. छत्रपतींना कसलेही अधिकार – राहिले नाहीत. अशा प्रकारे पेशवे हेच खरे सत्ताधीश बनले. –
पेशवाईची कारकिर्द पुढीलप्रमाणे-
- बाळाजी विश्वनाथ (इ. स. १७१३-२०)
- पहिला बाजीराव (इ. स. १७२०-४०)
- बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब (इ. स. १७४०-६१)
- थोरले माधवराव (इ. स. १७६१-७२)
- नारायणराव (इ. स. १७७२-७३)
- रघुनाथराव (इ. स. १७७३-७४)
- सवाई माधवराव (इ. स. १७७४-९५)
- दुसरा बाजीराव (इ. स. १७९६-१८१८)
पेशव्यांपैकी पहिले बाजीराव हे विशेष कर्तृत्ववान होते. त्यांनी मराठ्यांची सत्ता स्थिर केली व तिचा विस्तारही केला. ते खरे योद्धे होते. उत्तर भारतातही त्यांनी आपला दरारा निर्माण केला होता. तसेच दक्षिणेतील निजाम, पोर्तुगीज, सिद्दी इत्यादी शत्रूचा त्यांनी बंदोबस्त केला होता.
पेशवा नानासाहेबांची कारकिर्दही बरीच यशस्वी ठरली; पण त्याच्या कारकिर्दीत अखेरीस मराठ्यांना पानिपतच्या युद्धात (इ. स. १७६१) फार मोठा पराभव पत्करावा लागला.
पेशवे थोरले माधवराव हेदेखील कर्तृत्ववान होते. पानिपतच्या अपयशानंतर मराठा सत्तेची विस्कटलेली घडी नीट बसविण्यात त्यांनी मोठीच मुत्सद्देगिरी दाखविली होती; पण त्याच्यानंतर मात्र मराठेशाहीतील गृहकलह उफाळून आला.
रघुनाथरावाने पेशवेपद मिळविण्यासाठी नारायण-रावाचा खून करविला. तथापि, नाना फडणीस (फडणविस) व इतरांनी त्याचा डाव उधळून लावला; परंतु नंतर पेशवेपदी आलेला सवाई माधवराव अल्पायुषी ठरला; तर दुसऱ्या बाजीरावा-कडे कर्तृत्व व मुत्सद्देगिरी या दोहोंचाही अभाव होता. दुसऱ्या बाजीरावाने वसईचा तह (इ. स. १८०२) करून आपले स्वातंत्र्य इंग्रजांकडे गहाण टाकले.
अखेरीस इ. स. १८१८ मध्ये इंग्रजांनी पुणे ताब्यात घेऊन पेशवाई मोडीत काढली. अशा प्रकारे मराठी सत्तेचा अस्त झाला.
पेशवाईच्या अखेरच्या काळात राज्यात कसलीही व्यवस्था राहिली नव्हती. सर्वत्र अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पुंड, पेंढारी, दरोडेखोर या मंडळींनी संपूर्ण प्रदेशात आपली दहशत बसविली होती. त्यांना पायबंद घालण्याची क्षमता शासनयंत्रणेत राहिली नव्हती. सरकारी अधिकाऱ्यांनी तर पुंड, पेंढारी परवडले असे म्हणण्याची वेळ सामान्य लोकांवर आणली होती. अशा स्थितीत इ. स. १८१८ मध्ये जेव्हा पेशवाई कोलमडून पडली तेव्हा दुसऱ्या बाजीरावाच्या प्रजाजनांना त्याचे विशेष दुःख झाले नाही. उलट, असली जुलमी व भ्रष्ट राजवट नष्ट झाल्यामुळे अनेकांनी आनंदच व्यक्त केला. इंग्रज हे परकीय राज्यकर्ते असूनही त्यांचे राज्य या ठिकाणी स्थापन झाल्याची खंत सामान्य लोकांना वाटली नाही.
Also Read