प्राणिजीवन | Animal life information in Marathi
प्राण्यांच्या भौगोलिक अभ्यासास ‘प्राणिभूगोल’ म्हणतात. त्यात जीवावरणात आढळणारे विविध प्राण्यांचे वर्गीकरण, त्यांच्या उत्क्रांतीचा इतिहास आणि क्षेत्रीय वितरण यांबद्दलचा विचार येतो. त्याकरिता विशिष्ट प्रदेशात अधिवास असलेले प्राणी ज्या विशिष्ट पर्यावरणात राहतात, त्या सर्व प्राण्यांची ओळख आणि निश्चित माहिती असली पाहिजे. त्यांचे विविध प्रकारे केले जाणारे वर्गीकरण, त्यांचा विविध प्रकारे केला जाणारा विचार आणि त्यांचा वितरण आकृतिबंध माहीत असला पाहिजे.
वृक्ष आणि प्राणी यांतील सर्वांत महत्त्वाचा फरक म्हणजे वृक्ष अचल, स्थिर असतात तर प्राणी चल, गतिमान असतात हा आहे. फार थोड्या जलचर वनस्पती मर्यादित स्वरूपात गतिमान असतात. बहुतेक वृक्ष स्वयंपोषी, प्रकाश-संश्लेषक, मूलउत्पादक आणि सर्व प्राणी उपभोक्ते असतात.
प्राण्यांचे वर्गीकरण श्रेणीनुसार केले जाते.
हे वर्गीकरण करताना
- जमिनीवरील अथवा जलचर प्राणी
- तृणभक्षक किंवा मांसभक्षक
- सर्वभक्षक असे करता येते. त्यांच्या शरीररचनेनुसार ते पाठीचा कणा असलेले किंवा नसलेले असे होते.
थरांच्या खडकांत सापडणाऱ्या प्राण्यांच्या अवशेषां-वरून प्राण्यांच्या निर्मितीचा किंवा उगमाचा अंदाज घेता येतो. पाठीचा कणा नसलेला प्राणी साधारणतः ४६ कोटी वर्षांपूर्वी म्हणजे केब्रियन पूर्वकाळात निर्माण झाला असावा. क्लेमी (सन १९७६) यांच्या मते, सर्वांत पहिला प्राणी १० कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील झांबिया येथे जन्मला असावा. एप, एपमॅन, गिबॉन, ओरांग, गोरिला, चिंपांझी एपपासून प्लेईस्टोसिन काळात निर्माण झाले असावेत. प्लेईस्टोसिन युगाच्या शेवटी एपमॅनपासून माणूस जन्मला असावा.
उत्साही प्रसारण व निष्क्रिय प्रसारण
(१) पशुपक्ष्यांमध्ये त्यांच्या अधिवासबदलास प्रवृत्त करणारा, त्यास उत्तेजन देणारा एक महत्त्वाचा गुणधर्म असतो. त्यास ‘नैसर्गिक गतिक्षमता’ असे म्हणतात.
(२) पाण्यात प्राणी स्थलांतर करण्यास आणि त्याकरिता संघर्ष करण्यास नेहमी तयार असतात. ही त्यांची नैसर्गिक शक्ती प्राण्यांस स्थलांतरास प्रवृत्त करते. प्राण्यांत या स्थलांतरासाठी लागणारे काही गुणधर्म निसर्गतः असतात. जसे बीळ पाडता येणे, सरपटत जाता येणे, रांगत जाता येणे, पळता येणे, ओणव्याने पळता येणे, पोहता येणे, आकाशात उडता येणे, उंच चढता येणे, उड्या मारता येणे इत्यादी. या गुणांमुळे स्थलांतर किंवा प्रसारण कसे करावयाचे, केव्हा करावयाचे एवढेच नव्हे, तर प्रसारणाचे स्वरूप आणि वेगही प्राणीच ठरवितात. हे प्राणी स्व-प्रवृत्तीने उत्तेजित होऊन नैसर्गिकरीत्या गतिक्षम होतात. या त्यांच्या गतिक्षमतेला ‘उत्साही प्रसारण’ म्हणतात. हे पूर्णपणे प्राण्यांच्या गतिक्षमतेवर अवलंबून असते.
(३) अनेक प्राण्यांत हे वारसानुसार किंवा सामुदायिक गुणधर्मांनुसार निर्माण होते. जेव्हा हे प्रसारण बाह्य वाहकामुळे होते, तेव्हा त्यास ‘निष्क्रिय प्रसारण’ असे म्हणतात. हे निष्क्रिय प्रसारण-
हवेतून, पाण्यातून, प्राणिजीवनातून, मानव इत्यादींकडून होत असते.
(४) वनस्पती आणि प्राणी जगभर विविध मार्गे प्रसारण पावले, हरिण, सैगा, गवा, शेळ्या, कस्तुरी मृग, बैल, मॅस्टडॉन हे आशियाहून बेरिंगच्या सामुद्रधुनीतून उत्तर अमेरिकेत; तर बीव्हर, ऑपोसम, रॅकून, घोडे हे प्राणी उत्तर अमेरिकेतून बेरिंगच्या सामुद्रधुनीतून आशियात आले. रॅकून, मांजर, घोडे, टॅपीरस, लामा, उंट हे प्राणी उत्तर अमेरिकेतून मध्य अमेरिकेत व तेथून दक्षिण अमेरिकेत गेले. कॅपीबरस, पारक्यूपाईन, अरमाडिलो, ग्लायपटोडोनस, स्लोथ इत्यादी प्राणी दक्षिण अमेरिकेतून उत्तर अमेरिकेत गेले. बटरफ्लाय, योथस बिटल्स, टोळ, ल्युक्युरस, ढेकूण हे आफ्रिकेतून युरोप आणि आशियात गेले. तेथून ते जहाजातून दक्षिण अमेरिकेत गेले.
प्राणिवर्गाचे नष्ट होणे
(१) नव्या पेशी निर्माण होणे आणि असलेल्या काही पेशी नष्ट होत जाणे हा निसर्गनियम आहे. गेल्या २,००० वर्षांत सस्तन प्राणी आणि पक्षी यांपैकी सुमारे २०० प्रजाती नष्ट झाल्या असाव्यात. मानवाने ही नष्ट होण्याची क्रिया अधिक गतिमान केली.
(२) अनेक नष्ट होत असलेल्या प्रजातींना आता संरक्षण न दिल्यास त्या नष्ट होण्याच्या अवस्थेत आहेत. आज पक्ष्यांच्या सुमारे १५० वर्गांची संख्या फक्त २,००० आहे. लहान शेपटीचे अल्बेस्ट्रॉस फार तर १०० आहेत. १०० सस्तन प्राणी प्रजाती जवळजवळ नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
प्राणी नष्ट होण्याची कारणे
(१) एखाद्या प्रदेशात पर्यावरण बंदलल्यास प्राणी नष्ट होतात. हा बदल मंद असल्यास त्याच्याशी मिळतेजुळते घेण्याचा प्रयत्न प्राणी करतात. अनेक वेळा ते त्यात यशस्वी होतात; पण हा बदल शीघ्र असल्यास त्याच्याशी मिळतेजुळते घेणे प्राण्यांस अवघड जाते. परिणामतः अनेक जाती त्यामुळे नष्ट होतात. टर्शरी युगाच्या सुरुवातीला जगाचे तापमान एकदम कमी झाले. त्यामुळे अवाढव्य शरीर आणि लांब शेपटी असलेल्या डायनोसॉरला स्थलांतर करता आले नाही. तसेच थंड हवामानास तोंड देता आले नाही. त्यामुळे तो पूर्णतः नष्ट झाला.
(२) अनेक प्रदेशांत रोगराई निर्माण होते, कीटकांचा संसर्गदोष होतो आणि अनेक प्राणी नष्ट होतात.
(३) मोठे धरणीकंप, ज्वालामुखींचे स्फोट, अरण्यांस लागणाऱ्या आगी यांत अनेक प्राणी बळी पडतात.
(४) शिकारीमुळे अनेक प्राणी मारले जातात. मत्स्यभक्षक प्राण्यांची संख्या वाढल्याने त्यांच्यात अन्न मिळविण्याची स्पर्धा वाढते. अन्न मिळवू न शकणारे प्राणी नष्ट होतात. हवामानात बदल झाल्यास आवश्यक तसा निवारा न मिळाल्यामुळे अनेक सस्तन प्राणी नष्ट होतात.
(५) वाढत्या जीवनस्पर्धेत सुदृढ, मोठे प्राणी जीवनकलहात यशस्वी होतात. लहान, कमकुवत प्राणी नष्ट होतात.
(६) अनेक वेळा मानवाने पर्यावरणात केलेल्या ढवळा-ढवळीमुळे नैसर्गिक संतुलन नष्ट होते. त्यात अनेक प्राणी बळी पडतात. तसेच प्राण्याचा अधिवास नष्ट झाल्यामुळे, जमिनीचा वापर बदलल्यामुळे, रासायनिक किंवा आण्विक युद्धामुळे अनेक प्राण्यांच्या जाती नष्ट होतात. सन १८५१ ते १९०० व १९०० ते १९४४ या काळात अनुक्रमे ३१ व ४१ सस्तन प्राण्यांच्या नाती नष्ट झाल्या आहेत.