जल प्रदूषणाची कारणे आणि नियंत्रण कसे करायचे | Water pollution information in Marathi

जल प्रदूषणाची कारणे आणि नियंत्रण कसे करायचे | Water pollution information in Marathi

जेव्हा पाण्यामध्ये प्राणी, मानव व वनस्पतींना हानिकारक असणाऱ्या पदार्थांचे अथवा उष्णतेचे प्रमाण जास्त होते, तेव्हा त्याला ‘जल प्रदूषण’ असे म्हणतात. पाणी हा पृथ्वीवरील सर्वांत महत्त्वाचा नैसर्गिक स्रोत आहे; कारण पाण्याशिवाय सजीव सृष्टी अस्तित्वातच राहू शकत नाही. पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी ९७% पाणी महासागरांमध्ये असते. उरलेल्या ३ टक्के पाण्यामधील मोठा भाग बर्फाच्या स्वरूपात हिमनग व ग्लेशिअर या स्वरूपात असतो. त्या तुलनेत नद्या व तळी यांतील पाण्याचा साठा कमी असतो. पाण्याचा काही भाग वाफेच्या रूपात हवेमध्येही मिसळलेला असतो. पृथ्वीवरच्या जलावरणातील एकूण पाण्याचे साठे एकमेकांशी निगडित असून त्यांच्यात सतत देवाणघेवाण चालू असते. या देवाणघेवाणीला ‘जलचक्र’ असे म्हणतात. जलचक्राचे चलनवलन सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेवर अवलंबून असते.

जलचक्राचे सर्व भाग म्हणजे नद्या, तळी यांतील गोडे पाणी, विहिरी व विंधन विहिरीत असणारे भू-जल आणि समुद्राचे पाणी हे प्रदूषित होऊ शकते. पाण्याचे प्रदूषण घडविणाऱ्या प्रदूषकांचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारे करता येते. प्रदूषकांचा उगम कोठून आहे यानुसार त्यांचे वर्गीकरण ‘विशिष्ट स्थाननिष्ठ’ आणि ‘अविशिष्ट’ असे दोन प्रकारांत करता येते.

जेव्हा एखाद्या विशिष्ट ठिकाणी प्रदूषण करणारा स्रोत असतो तेव्हा त्याला ‘विशिष्ट स्थाननिष्ठ’ असे म्हणतात. उदाहरणार्थ- एखाद्या नाल्यामध्ये सोडलेले सांडपाणी एखाद्या कारखान्यातून बाहेर पडते किंवा शहरातील सांडपाण्याचा नदीमध्ये सोडलेला प्रवाह. काही प्रसंगी प्रदूषकांचा निचरा होऊन ते पाण्यात येतात; परंतु नेमके ते कुठून आले हे शोधणे अवघड जाते. काही वेळा शेतीतून बाहेर जाणारे पाणी, सांडपाणी, शहरातील गटारे, कारखाने वगैरे अनेक ठिकाणांहून प्रदूषके पाण्यामध्ये शिरत असतात. अशी अविशिष्ट प्रदूषके शोधणे आणि त्यांना प्रतिबंध करणे, हे फार अवघड असते.

प्रदूषकांच्या रचनेनुसार अथवा गुणधर्मांनुसार त्यांचे तीन मुख्य प्रकार पडतात

  1. भौतिक प्रदूषक : सांडलेले तेल, गरम पाणी, गरम वाफ वगैरे.
  2. रासायनिक प्रदूषक: कीडनाशके, धातू व धातुजन्य क्षार वगैरे.
  3. जैविक प्रदूषक : विषाणू, जिवाणू, शैवाल, कवक वगैरे.

जलावरणाच्या प्रदूषणाची कारणे

a body of water with trees and buildings in the background
pollution

मानवी व्यवहारातील अनेक गोष्टींमुळे जलावरणाचे प्रदूषण होत असते. पाण्याचे प्रदूषण घडविणारी काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

(१) शहरी-निमशहरी सांडपाणी शहरातील व अर्धशहरी भागातील घरगुती वापरातून निर्माण होणारे सांडपाणी (स्वयंपाकघरे, स्वच्छतागृहे वगैरे) गटारांमधून जमा होऊन ते शहराबाहेर मोठ्या जलाशयात अथवा नदीनाल्यांत सोडले जाते. सांडपाण्यातून नदीनाल्यांमध्ये प्रामुख्याने सेंद्रिय द्रव्ये, नायट्रेट, डिटर्जेंट, धातु, क्षार व जैविक घटक (मैल्यातील जिवाणू) सोडले जातात. या घटकांचा अतिरिक्त ताण जलाशय अथवा नदीतील पर्यावरण संस्थेवर आल्यास ती संस्था निकामी होते. पाण्यातून उत्पन्न होणाऱ्या रोगांच्या साथी हे जल प्रदूषणातून उद्भवणारे मुख्य संकट आहे.

(२) औद्योगिक सांडपाणी सर्व प्रकारच्या उद्योगांमधून वाया जाणारे पाणी नदी वा सरोवरात सोडले जाते. त्यांमध्ये विविध प्रकारचे जैविक, सेंद्रिय व रासायनिक प्रदूषके असतात. या प्रदूषकांमुळे भारतात कित्येक मोठ्या नद्या व उपनद्या जलस्रोत म्हणून निकामी झाल्या आहेत. विद्युत्न्निर्मिती, साखर उद्योग, रंग, सिमेंट उद्योग, तेल शुद्धीकरण संयंत्रे, अशा अनेक ठिकाणी ४० ते ५० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त गरम पाणी बाहेर टाकले जाते. अशा गरम पाण्यामुळे जलाशयातील ऊर्जा वाढते आणि त्याचा विपरीत परिणाम तेथील सूक्ष्मजीवांवर होतो.

(३) जमिनीवरून वाहणारे पाणी पावसाचे पाणी भू-प्रदेशावर पडणे आणि ते वाहून नदी-नाल्यांमधून जाऊन समुद्राला मिळणे हा जलचक्राचा नैसर्गिक भाग आहे. तथापि, जमिनीवरून पाणी वाहून जाताना त्यात अनेक प्रदूषके मिसळतात. पाणी कोणत्या भू-प्रदेशातून वाहत आहे, यावर त्यात मिसळणाऱ्या प्रदूषकांचे प्रकार व प्रमाण अवलंबून असते. शहरी व निमशहरी भार्गातून वाहणाऱ्या पाण्यामध्ये मुख्यतः जैविक विघटनक्षम प्रदूषके आणि जैविक प्रदूषके (रोगजंतू) असतात; तर ग्रामीण भागातून वाहत जाणाऱ्या पाण्यात जनावरांचे मलमूत्र, कुजणारे सेंद्रिय घटक आणि शेते व बागांमध्ये वापरलेली कीडनाशके, तणनाशके व खते यांचे उर्वरित रासायनिक घटक असतात. औद्योगिक क्षेत्रातून वाहत येणाऱ्या पाण्यामधून नद्या व जलाशयां-मध्ये धातू, विषारी क्षार, आम्ले, अल्कधर्मी रसायने आणि हायड्रोकार्बन असतात.

(४) तेलगळती : तेलगळती हा अलीकडच्या काळातील जल प्रदूषणाचा एक महत्त्वाचा स्रोत ठरत आहे. विशेषतः तेलगळतीमुळे किनारी भागातील पर्यावरणाला धोका उत्पन्न होतो. मोठमोठी जहाजे, नाबा आणि तेल वाहून नेणारे टँकर यांची वाहतूक खाड्या, नद्या, जलाशय, सरोवरे, कालवे आणि समुद्रातून होत असते. या सर्वांमधून अपघाताने तेलाची गळती होऊन त्या ठिकाणच्या पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होतो.

भू-जल प्रदूषण

भू-जल हा जीवावरणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जमिनीच्या पोटातील पाणी दोन प्रकारचे असते. जमिनीमध्ये वरच्या भागात साचलेले पाणी आणि भू-जलस्तराच्या (Water-table) खालच्या संतृप्त (Saturated) जमिनीत असणारे पाणी हे ते दोन प्रकार आहेत. पाण्याच्या इतर स्रोतांप्रमाणेच जमिनीच्या आत खोलवर असणारे पाणीही विविध कारणांमुळे प्रदूषित होऊ शकते. भू-जल प्रदूषणाच्या समस्येमध्ये दोन विशेष घटक महत्त्वाचे ठरतात. जमिनीमध्ये पाणी मुरून खाली जाताना ते स्तंभाच्या स्वरूपात सरळ खाली खाली जाताना आपल्याबरोबर प्रदूषक वाहून नेते. हे पाणी आजूबाजूला पसरत नसल्याने प्रदूषकांचे प्रमाण कमी होण्याचे प्रमाण घटते. उलट, वरून खाली जाणारे प्रदूषक खालीच साचून त्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका मोठा असतो. तसेच भू-जलाचा संबंध बाहेरील ऑक्सिजनशी येत नसल्यामुळे पाण्यात ऑक्सिडीकरण क्रिया घडून येत नाही. म्हणजेच या मार्गाने पाणी शुद्ध होण्याचा काहीच संभव भू-जलाच्या बाबतीत नसतो.

औद्योगिक क्षेत्रात अथवा शहरी भागात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ते काही काळ मोठ्या टाक्यांमध्ये साठवून ठेवले जाते. बऱ्याच वेळा या टाक्या जंमिनीखाली असतात आणि त्यांच्यातून पाणी खालच्या थरांमध्ये मुरते. हे होताना सांडपाण्यामधील जिवाणू, विषाणू, जैविक रसायने, कीडनाशके, धातू, क्षार इत्यादी अपायकारक घटक मातीच्या थरांमधून झिरपत जाऊन भू-जलात मिसळतात. भारतात अनेक भागांत भू-जल अशा प्रकार प्रदूषित झाले असल्याचे आढळून आले आहे. भू-जलामध्ये धातू व क्षार मिसळून त्यांचा विपरीत परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भू-जलामध्ये मिसळणारे फ्लुराइड क्षार दातांबर, हाडांवर आणि सांध्यांवर विपरीत परिणाम करतात. त्याचप्रमाणे आर्सेनिक हा विषारी धातूदेखील भू-जलात असू शकतो. आर्सेनिकयुक्त पाणी प्यायल्यामुळे विविध गंभीर विकार उद्भवतात.

जल प्रदूषण नियंत्रण

water pollution
water pollution

(१) जल प्रदूषणाचा विचार करताना पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजन वायूचे प्रमाण हा महत्त्वाचा निकष आहे. दरलीटर पाण्यामध्ये विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण ८.० मिलिग्रॅमपेक्षा कमी असेल तर ते पाणी प्रदूषित आहे असे मानले जाते. हे प्रमाण ४.० मिलिग्रॅमपेक्षा कमी असेल तर ते पाणी अत्यंत प्रदूषित आहे असे म्हणतात; कारण पाण्यातील सजीवांच्या जीवनासाठी पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन वायू पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक असते. पाण्यामध्ये असलेल्या एकूण विघटनक्षम व अविघट-नक्षम सेंद्रिय घटकांचे ऑक्सिडीकरण (Oxidation) होण्यासाठी पाण्यात ऑक्सिजन वायू असणे गरजेचे असते. या प्रमाणाला पाण्याची ‘रासायनिक ऑक्सिजन गरज’ असे म्हणतात. त्याचप्रमाणे जल प्रदूषणाच्या संदर्भात पाण्याची ‘जैविक ऑक्सिजन गरज’ हा महत्त्वाचा निकष मानला जातो.

(2) पाण्यामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनच्या सान्निध्यात विघटन करू शकणाऱ्या सूक्ष्मजीवांना (Aerobic Microbes) ऑक्सिजनची गरज असते; त्यामुळे पाण्यामध्ये जी ऑक्सिजनची मागणी निर्माण होते ती म्हणजे ‘जैविक ऑक्सिजन गरजपातळी’ होय.

(3) पाण्यामध्ये सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जेवढे जास्त असेल तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते. म्हणूनच जास्त जैविक ऑक्सिजन गरजपातळी म्हणजे पाण्यात सेंद्रिय पदार्थ जास्त आहेत हे स्पष्ट होते. तसेच बीओडी पातळी जेवढी जास्त तेवढे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. तसेच पाण्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातून गरम सांडपाणी येत असेल तर विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. अत्यंत कमी ऑक्सिजन असूनही काही कीटकाच्या अळ्या आणि ट्युबिफेक्स ही वलयांकित कृमींची प्रजात (Annelid) जिवंत राहतात. या प्रजातींचे प्राणी आढळणे हादेखील प्रदूषण समजण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे.

(4) भारतात नद्या-नाले आणि त्यांच्यावर बांधलेली घरणे (जलाशय) यांच्यात जल प्रदूषणाचा मुख्य उगम शहरी व अर्धशहरी सांडपाणी हा आहे. शहरातून नदीत सोडलेल्या सांडपाण्यात मैला मिसळलेला असेल तर अशा पाण्यात कोलिफॉर्म सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव रोग उत्पन्न करीत असल्याने त्यांचे प्रमाण दर शंभर मिलिलीटर पाण्यात ५०० पेक्षा कमी असणे मानवी आरोग्याला हिताचे मानले जाते. जर हे प्रमाण दर शंभर मिलिलीटरमध्ये २,५०० पेक्षा जास्त झाले तर पाणी पिण्यास अयोग्य आणि धोकादायक समजतात,

(5) औद्योगिक वापराच्या आणि शेती वगैरेंच्या वापरासाठी असलेल्या पाण्यामध्ये बोरॉनचे प्रमाण दर लीटरला २ मिलिग्रॅमपेक्षा जास्त नसावे आणि सोडिअम शोषून घेण्याचे गुणोत्तर २६ पेक्षा जास्त नसावे असे ठरविण्यात आले आहे. जल प्रदूषणासाठी करण्याच्या उपाययोजना मुख्यतः शहरी सांडपाणी आणि औद्योगिक सांडपाणी यांच्यातील घातक पदार्थ काढून टाकण्यासाठी केल्या जातात. कारण जल प्रदूषणाच्या अनुक्रमे ७५ टक्के आणि २० टक्के भाग या दोन उगमांमुळे प्रदूषित झालेला असतो. या दोन्ही ठिकाणांहन जलस्रोतांमध्ये बाहेर टाकल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केल्या जातात. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या गाळण्या, कार्बनसारखे प्रदूषक शोषून घेणारे घटक, क्लोरीन वायू, क्लोरीनचे क्षार (उदाहरणार्थ- परक्लोरेट), ओझोन वायू आणि अतिनील किरण यांचा उपयोग केला जातो.

नमस्कार! मी रोहित म्हात्रे. सामान्य ज्ञान विषय शिकवण्याचा मला विशेष अनुभव आहे. कठीण गोष्टी सहजतेने समजावणे हेच माझं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या माध्यमातून सक्षम बनवणे हेच माझं ध्येय आहे.

Leave a Comment