देशात आढळणारे मृदाप्रकार | Types of Soils in India in Marathi
ज्यामध्ये वनस्पतिजीवन समृद्ध होते अशा भू-पृष्ठाच्या सर्वांत वरच्या भुसभुशीत थरास ‘मृदा’ असे म्हणतात. मृदा मुख्यतः तळखडकांपासून बनते. मृदा बनण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालू असते. या प्रक्रियेत खडकांचे बारीक-बारीक कणांत रूपांतर होऊन मृदा तयार होत असते. स्थानिक परिस्थितीनुसार या प्रक्रियेत बदल होत असतात, त्या-त्या प्रदेशातील हवामान, तळखडकाचा प्रकार, जमिनीतील पाण्याचा अंश, जमिनीतील वनस्पतिजन्य आणि प्राणिजन्य पदार्थांचे प्रमाण, जमिनीचा उतार इत्यादी बाबींचा मृदेच्या निर्मितीवर व तिच्यातील घटकद्रव्यांच्या प्रमाणावर परिणाम घडून येतो.
भौगोलिक स्थानानुसार वरील घटकांमध्ये बदल होत असल्याने वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांत वेगवेगळे मृदा-प्रकार आढळतात. भारतासारख्या महाकाय देशात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या भौगोलिक परिस्थितींत फार मोठ्या प्रमाणावर फरक आढळून येतो. परिणामी, देशातील वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी आढळणाऱ्या मृदेच्या स्वरूपात व गुणधर्मातही मोठ्या प्रमाणावर विविधता आढळते. देशात आढळणारे काही मृदाप्रकार पुढीलप्रमाणे:
1. गाळाची मृदा
(१) नदीच्या जोरदार प्रवाहामुळे व तीव्र अशा उतारावरून वाहण्यामुळे खडकांचे बारीक बारीक तुकडे होतात; खडकांची मोठ्या प्रमाणावर झीज होते. ठिसूळ खडकांचे छोटे-छोटे तुकडे होतात.
(२) प्रदीर्घ काळ चालणाऱ्या या प्रक्रियेतून निर्माण झालेली मृदा, नदीच्या मुख्य प्रवाहाबरोबर वाहत येऊन संचयित केली जाते. सखल मैदानी प्रदेशात एकावर एक या प्रकारे या मृदेचे थर साचतात.
(३) देशातील उत्तरेकडील मैदानी प्रदेश हा अशा प्रकारे डोंगरभागाची झीज घडवून वाहून आलेल्या गाळाच्या मातीने बनलेला आहे. या गाळमातीचे ‘भांगर’ आणि ‘खादर’ असे दोन मुख्य प्रकार पडतात.
(४) ‘भांगर’ म्हणजे पूर्वी केव्हातरी वाहून येऊन संचयित झालेली माती होय. ही माती मैदानातीलच उंचवट्याच्या भागात नद्यांपासून दूर आढळते. ही माती राखट रंगाची असून तिच्या थरांची जाडी बरीच असते.
(५) नव्यानेच वाहून येऊन संचयित झालेल्या गाळमातीस ‘खादर’ असे म्हणतात. नदी-खोऱ्यातील सखल व कमी उंचीच्या भागात ही माती आढळते. दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे खादर मातीच्या पृष्ठभागावर गाळाच्या नव्या थरांची भर पडते.
(६) साहजिकच, खादर माती शेतीसाठी अधिक उपयुक्त ठरते; त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून या मृदाप्रकारास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गहू, तांदूळ यांसारखी तृणधान्ये व कापूस, ताग, ऊस यांसारखी पैसे मिळवून देणारी नगदी पिके (Cash Crops) या मातीत घेतली जातात.
2. वाळवंटी मृदा
(१) देशातील पश्चिम व वायव्य भागातील रूक्ष व कोरड्या प्रदेशात वाळवंटी मृदा आढळते. गुजरात, राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतील मृदा या प्रकारच्या आहेत. साहजिकच, ही मृदा वाळूमिश्रित असून तिच्यातील सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण बरेच कमी आहे.
(२) ही मृदा सच्छिद्र असून पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यास या मृदेत विविध कृषि उत्पादने घेता येतात, वाळवंटी मृदेने व्यापलेल्या प्रदेशात अधूनमधून काटेरी, खुरट्या वनस्पती आढळतात.
3. रेगूर किंवा काळी मृदा
(१) या प्रकारची मृदा प्रामुख्याने दख्खनच्या पठारी प्रदेशात आढळते. दख्खनच्या पठाराचा फार मोठा भू-भाग असिताश्म (बेसॉल्ट) या अग्निजन्य म्हणजेच लाव्हारसापासून निर्माण झालेल्या खडकाने व्यापलेला आहे. प्रदीर्घकालीन प्रक्रिया होऊन या खडकांपासून रेगूर मृदेची निर्मिती झालेली आहे.
(२) रेगूर मृदेत मुख्यतः चिकणमाती, वाळू आणि काही प्रमाणात सेंद्रिय द्रव्ये असतात; त्यामुळेच या मृदेस काळपट रंग आलेला आहे. या मृदेचा काळपट रंग आणि तीमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकविला जाणारा कापूस यामुळे या मृदेस ‘ब्लॅक-कॉटन सॉईल’ असेही म्हणतात.
(३) कापसाशिवाय ज्वारी, बाजरी यांसारखी अन्नधान्ये आणि ऊस व तेलबिया यांच्या उत्पादनासाठीही ‘काळी मृदा’ उपयोगी आहे.
(४) या मृदेच्या थरांची सर्वाधिक जाडी नदीकाठावरील प्रदेशात आढळून येते; तर डोंगराळ भागात तिची जाडी कमी झालेली दिसते.
(५) महाराष्ट्रापुरता विचार करता रेगूर’ हा राज्यांतील सर्वांत महत्त्वाचा मृदाप्रकार ठरतो. राज्याच्या पठारी भागातील बराचसा भू-भाग या मृदेने व्यापलेला आहे.
(६) गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी, वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यांत रेगूरचे मोठे थर आढळून येतात.
4. तांबडी मृदा
(१) ही मृदा प्रामुख्याने दक्षिण भारतात पूर्व घाटालगतच्या प्रदेशात आढळते. आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथील मृदा बहुतांशी याच प्रकारची आहे. ईशान्य भारतातील आसामसारख्या भागात या मृदेचे विरळ पुंजके आढळतात.
(२) लोहाच्या अतिरिक्त प्रमाणामुळे या मृदेच्या तपकिरी वा पिवळसर छटाही आढळतात. ही मृदा म्हणजे चिकणमाती आणि वाळू यांचेच एक प्रकारचे मिश्रण असल्याने ती पुरेशी सच्छिद्र आहे; त्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होतो.
(३) शेतीच्या दृष्टीने ही मृदा मध्यम दर्जाची मानली जाते. नद्यांच्या खोऱ्यात तांबड्या मृदेचे जाड थर असल्याने तेथे ती अधिक सुपीक आहे. अशा सुपीक मृदेत भात, तेलबिया आणि ऊस यांसारखी पिके घेतली जातात.
(४) डोंगराळ भागात या मृदेचे थर पातळ असल्याने त्या ठिकाणी ज्वारी, बाजरी यांसारखी भरड पिके घेतली जातात.
(५) विशेषत्वाने उष्ण कटिबंधात सापडणाऱ्या मृदाप्रकारांपैकी हा एक प्रकार आहे.
5. क्षारयुक्त अल्कली मृदा
(१) उत्तर भागातील वाळवंटी आणि अर्ध-वाळवंटी प्रदेशातील रूक्ष आणि कोरड्या भागात क्षारयुक्त मृदा आढळते. या मृदेत अल्कली द्रव्यांचे प्रमाण अधिक असते. तसेच कॅल्शिअम आणि सोडिअम या मूलद्रव्यांचे प्रमाणही या मृदेत अधिक आढळते.
(२) किनारी भागातील खारटान जमिनीत छोट्या-छोट्या पुंजक्यांच्या स्वरूपात क्षारयुक्त खारी मृदा आढळते. हीदेखील एक प्रकारची अल्कली मृदाच होय.
6. डोंगराळ आणि वन्य प्रदेशातील मृदा
(१) हिमालय, ईशान्येकडील डोंगराळ राज्ये आणि कर्नाटकातील कोडगूसारख्या भागांत डोंगरी मृदा आढळते. हा बहुतांश भाग दाट वनांखाली असल्याने या मृदेत पालापाचोळा, झाडाच्या फांद्या, प्राण्यांचे अवशेष यांपासून निर्माण झालेल्या सेंद्रिय द्रव्यांचे तसेच नायट्रोजनसारख्या घटक द्रव्यांचेही प्रमाण अधिक असते.
(२) ही मृदा डोंगरउतारावर असल्याने तिचे वहन सतत चालू असते. या मातीत सुपीकताही कमी असते.
(३) ज्या ठिकाणी डोंगरउतारावरील माती पावसाने वाहून जाऊन डोंगरतळाशी संचयित होण्याचे कार्य प्रदीर्घ काळ घडत आले आहे, अशा ठिकाणी डोंगरतळाशी या मातीचे जाड थर तयार झालेले दिसून येतात. अशा थरांची सुपीकता तुलनात्मक-दृष्ट्या अधिक असते.
जांभी मृदा
(१) पश्चिम घाट प्रदेशात भीमाशंकरच्या दक्षिणेला थेट केरळपर्यंत लालसर रंगाची मृदा अधूनमधून आढळून येते. ही मृदा जांभा नावाच्या लालसर, काळपट खडकांपासून बनलेली असल्याने तिला ‘जांभी मृदा’ असे संबोधले जाते. जांभा प्रकारच्या दगडाची निर्मिती ही ‘बेसॉल्ट’ या अग्निजन्य खडकांपासून झाली आहे.
(२) या मृदेच्या निर्मिती-प्रक्रियेसाठी भरपूर पाऊस आणि उष्णता यांची गरज असते; त्यामुळे जांभा प्रकारचा खडक आणि जांभी मृदा पश्चिम घाट आणि कोकणपट्टीतील जास्त पावसाच्या भागात सापडते.
(३) या मृदेत चिकणमातीचे प्रमाण कमी असून जाड्या-भरड मातीचे प्रमाण अधिक असते. ही माती फारशी सुपीक नसल्याने तिच्यामध्ये भात, वरई, नाचणी यांसारखी भरडधान्ये घेतली जातात. आंबा, काजू, फणस यांसारखी फळेही या मातीत पिकविली जातात.
मित्रांनो मला अशा आहे तुम्हाला या लेखातून भारतात आढळणाऱ्या मृदा आणि त्यांचे महत्व समजले असेल तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.